गोष्ट सुरू होते एका हाय-प्रोफाईल पार्टीतून. तिथे वनिता (टिस्का चोप्रा) नावाच्या एका साध्या, कोणाचंही लक्ष वेधून न घेणाऱ्या महिलेबद्दल काही बायका कुजबुज करत असतात.
advertisement
त्याच पार्टीत वनिता पाहते की, तिची मैत्रीण रसिका (रसिका दुग्गल) ही वनिताच्या पतीशी (आदिल हुसेन) जरा जास्तच जवळीक साधण्याचा प्रयत्न करतेय, त्यांच्यात उघडपणे फ्लर्टिंग सुरू असतं. वनिता हे सर्व शांतपणे पाहते, पण तिच्या मनात काय चाललंय याची कोणालाच कल्पना नसते.
दुसऱ्या दिवशी सकाळी रसिका वनिताच्या घरी येते. वनिता तिचं हसतमुखाने स्वागत करते आणि तिला गरमागरम भजी, थंड पेय आणि एक खास हिरवी चटणी खायला देते. चटणीची चव चाखताच रसिका थक्क होते आणि तिची खूप स्तुती करते.
नेमकी इथूनच खेळाला सुरुवात होते! वनिता अगदी शांतपणे रसिकाला तिच्या एका जुन्या नोकराची, भोलाची गोष्ट सांगायला लागते. ती सांगते की, भोलाने जेव्हा वनिताच्या दीराला आणि स्वतःच्या पत्नीला रंगेहात पकडलं, तेव्हा त्याची कशी हत्या करण्यात आली.
वनिता पुढे जे सांगते ते ऐकून रसिकाच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडतो. वनिता सांगते की, त्यांनी भोलाचा मृतदेह घराच्या अंगणातच दफन केला आणि त्यावर माती टाकून तिथेच कोथिंबीर, मिरच्या आणि पुदिना लावला आणि आज रसिका जी चटणी खातेय, ती त्याच मातीतील कोथिंबिरीची आहे.
ही फिल्म केवळ एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित नाही, तर ती एका स्त्रीच्या छुप्या रागाचं आणि सूडाचं अचूक दर्शन आहे. टिस्का चोप्राने ज्या पद्धतीने एका बिचाऱ्या वाटणाऱ्या गृहिणीची भूमिका साकारली आहे, ती पाहून तुमची झोप उडेल.
आदिल हुसेन आणि रसिका दुग्गल यांनीही आपल्या अभिनयाने या कथेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. याच कारणामुळे या शॉर्ट फिल्मला IMDb वर चक्क ८.८ रेटिंग मिळालं आहे.
'रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट शॉर्ट्स' या यूट्यूब चॅनलवर ही फिल्म मोफत उपलब्ध आहे. केवळ १७ मिनिटांत ही कथा तुम्हाला असं काही चटका लावून जाईल की, तुम्ही चटणीच्या प्रत्येक घासाकडे संशयाने पाहाल.
