जिब्रान खान वांद्रे येथे राहतो आणि माउंट मेरी जवळ त्याचं ‘ग्राऊंडेड कॅफे’ नावाचं एक लोकप्रिय कॅफे आहे. ३१ वर्षीय अजय सिंह रावत हा २०२० पासून या कॅफेचा मॅनेजर म्हणून काम करत होता. कॅफेमध्ये येणारी रोकड दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करण्याची जबाबदारी त्याची होती.
गेल्या काही दिवसांपासून कॅफेला माल पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांची बिलं थकल्याची तक्रार जिब्रान खानकडे येत होती. १९ सप्टेंबर रोजी स्टोअर मॅनेजरने ही गोष्ट जिब्रानला सांगितली, तेव्हा मॅनेजर अजय सुट्टीवर होता. तो गावाहून परतल्यावर जिब्रानने त्याला विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, ज्यामुळे जिब्रानचा संशय वाढला.
advertisement
चार्टर्ड अकाऊंटंटने उघड केले सत्य!
यावर जिब्रान खानने लगेच त्याच्या चार्टर्ड अकाऊंटंटला कॅफेच्या खात्यांचं ऑडिट करायला सांगितलं. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या एका वर्षाच्या आर्थिक लेखाजोखा तपासल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. कॅफेचा व्यवसाय १.१४ कोटी रुपयांचा झाला होता, पण बँकेत फक्त ७९.६७ लाख रुपये जमा झाले होते. म्हणजेच, मॅनेजर अजय रावतने तब्बल ३४ लाख ९९ हजार रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरले होते.
या सगळ्या प्रक्रियेत जिब्रान खानची झालेली फसवणूक पाहून, त्याने त्वरित वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अजय सिंह रावतविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (४) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.