'शो मस्ट गो ऑन' असं म्हणतात. शंतनुच्या बाबतीत हे अत्यंत खरं आहे. प्रियाच्या मृत्यूनंतर शंतनुची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुंबई टाइम्सशी बोलताना शंतनु म्हणाला, "मध्यंतरीच्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं आवश्यक होतं, म्हणून कोणत्याच कलाकृतीत मी दिसलो नाही. आयुष्यात आलेलं ते वळण पार केल्यानंतर पुन्हा कामाला लागलो आहे. कारण माझे वडील अभिनेते श्रीकांत मोघे मला नेहमी सांगायचे ती आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काहीही कमी पडू द्यायचं नाही. व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं. वैयक्तिक सुख-दुःख खुंटीला टांगून त्या-त्या व्यक्तिरेखेची सुख-दुःख आपलीशी करणं हा कलाकाराचा धर्म असतो."
advertisement
कामाची कमिटमेन्ट आणि प्रियाविषयी बोलताना शंतनु म्हणाला, 'कोणत्याही परिस्थितीत कलाकृतीशी असलेली कमिटमेंट पाळायची हा कलाकारानं स्वतःशी केलेला अलिखित करार असतो. काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली आहे. आजवर प्रियावर आणि माझ्यावर रसिक मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, हीच आमची खरी ताकद आहे.'
येड लागलं प्रेमाचं या मालिकेत शंतनू मंजिरीच्या भावाची भूमिका साकारत आहे. या भुमिकेविषयी बोलताना शंतनू म्हणाला, ही भूमिका आता नकारात्मक वाटत असली तरी विविध भावभावनांच्या छटा यात पाहायला मिळतील. या मालिकेच्या निमित्तानं मी स्टार प्रवाह वाहिनी, सतीश राजवाडे आणि सोल प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेचा ऋणी आहे, त्यांनी मला समजून घेतलं.'