मराठी चित्रपटाला पद्मविभूषण इलैयाराजा यांनी संगीत देणं ही संपूर्ण सिनेसृष्टीसाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. अशातच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील थलायवा म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार धनुष याने या सिनेमाच्या गाण्याचं कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी 'गोंधळ'मधील 'चांदणं' हे पहिले रोमँटिक गाणे रिलीज झाले आणि या गाण्याची जादू प्रेक्षकांवर आणि चक्क सुपरस्टार धनुषवरही झाली.
advertisement
इलैयाराजा यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला दिले संगीत
इलैयाराजा यांनी पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. त्यांची संगीत रचना आणि माधुर्य 'चांदणं' गाण्यात अनुभवायला मिळत आहे. धनुष आणि इलैयाराजा यांचे खास बॉन्डिंग आहे. या दोघांनी अनेक दाक्षिणात्य सिनेमांसाठी एकत्र काम केले आहे आणि धनुषने इलैयाराजांच्या गाण्यांना आपला आवाजही दिला आहे.
'चांदणं' गाण्याची लिंक शेअर करत धनुषने 'एक्स' प्लॅटफॉर्मवर एक खास पोस्ट लिहिली. धनुष म्हणाला, "'गोंधळ' या मराठी चित्रपटातील 'चांदणं' हे गाणं हे आपले उस्ताद @ilaiyaraaja सर यांनी तयार केलेलं एक खरं रत्न आहे. तुम्ही आम्हाला आश्चर्यचकित करण्याचे थांबवत नाही राजा सर.. कृतज्ञ.", स्वतः साऊथच्या सुपरस्टारने केलेल्या या कौतुकामुळे 'गोंधळ' चित्रपटाला आणि मराठी चित्रपटसृष्टीला मोठी दाद मिळाली आहे.
गायक आणि कलाकारांची फौज
'चांदणं' या रोमँटिक गाण्याला अजय गोगावले, आर्या आंबेकर आणि अभिजीत कोसंबी यांसारख्या प्रतिभावान गायकांनी आवाज दिला आहे. हे गाणे योगेश सोहोनी आणि इशिता देशमुख या जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात इलैयाराजा अजय गोगावले आणि आर्या आंबेकर यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. हे क्षण संगीतप्रेमींसाठी मोठी पर्वणीच आहेत.
संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत 'गोंधळ' हा चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, सुरेश विश्वकर्मा, कैलाश वाघमारे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
