कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
सुलक्षणा पंडित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील फारसे चेहरे उपस्थित नव्हते. दिग्गज अभिनेत्री पूनम ढिल्लों वगळता, केवळ त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे लोकच या दुःखात सहभागी झाले होते. दरम्यान, लाडक्या बहिणीला अखेरचा निरोप देताना सुलक्षणा पंडित यांची बहीण आणि अभिनेत्री विजयता पंडित यांना अश्रू अनावर झाले. विजयता पंडित यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
advertisement
फुलांनी सजवलेल्या रुग्णवाहिकेतून सुलक्षणा यांचे पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यांचे भाऊ ललित पंडित आणि विजयता यांचा मुलगा यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. संपूर्ण पंडित कुटुंब यावेळी अत्यंत भावूक झाले होते.
बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुलक्षणा यांच्या अंत्यसंस्काराकडे फिरवली पाठ
गेल्या दोन महिन्यांत पंकज धीर, असरानी, सतीश शाह आणि आता सुलक्षणा पंडित अशा एकापाठोपाठ एका दिग्गज कलाकारांचे निधन झाले आहे. अशातच ७० आणि ८० च्या दशकात टॉप अभिनेत्री आणि गायिका असलेल्या सुलक्षणा पंडित यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडच्या प्रमुख कलाकारांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.
अभिनेत्री जरीन खान यांचेही निधन
सुलक्षणा यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेत्री जरीन खान यांचेही निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला मात्र ऋतिक रोशन, जया बच्चन, बॉबी देओल यांच्यासह अनेक मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते, ज्यामुळे सुलक्षणा पंडित यांच्या अंत्यसंस्कारासाठीची कमी उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
सुलक्षणा पंडित यांना जतिन, ललित, मंदीर पंडित असे तीन भाऊ आणि संध्या, माया, विजयता या तीन बहिणी आहेत. त्यांचे सर्व भाऊ संगीत इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. अभिनय आणि गायनानंतर उर्वरित आयुष्यात त्यांना कुटुंबानेच मोठा आधार दिला होता.
