बाळासाहेबांमुळे मिळाली २४ तास पोलीस सुरक्षा!
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगावकर यांनी आपले अनुभव कथन केले. त्या म्हणाल्या, "बाळासाहेब ठाकरेंचं घर माझ्या शेजारीच होतं. त्यामुळे मला नेहमीच २४ तास छान पोलीस सुरक्षा मिळायची. कधीही, अगदी रात्री-अपरात्री कलानगरमध्ये जाताना मला भीती वाटली नाही."
बाळासाहेबांच्या दिलखुलास स्वभावाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "बऱ्याच वेळेला ते मला घरी बोलावून घ्यायचे, गप्पा मारायचे, छान गोष्टी आणि विनोद सांगायचे. त्यांचा स्वभाव खूप खेळकर होता आणि ते फार मार्मिकपणे बोलायचे. ते मला नेहमी म्हणायचे, 'काय गं... गोव्याची मुलगी. कशी काय गोव्यावरून इथे आलीस? दामूकडे राहतेस तू..?'"
advertisement
"कॅलरीशिवाय बिअर पितो!" - बाळासाहेबांचा विनोद
वर्षा उसगावकर यांनी बाळासाहेबांच्या विनोदी आणि अनपेक्षित स्वभावाचा आणखी एक किस्सा सांगितला. "एकदा मी आणि आई त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हाही त्यांनी आम्हाला खूप हसवलं, असाच त्यांचा स्वभाव होता. मला आठवतंय, ते म्हणाले होते की, 'मी बिअर पितो, पण ही कॅलरीशिवाय असलेली बिअर आहे.' तेव्हा मी मनात विचार केला, बापरे, हे सगळ्यांना सांगून बिअर पितात!"
त्या पुढे म्हणाल्या, "असा त्यांचा गंमतीशीर स्वभाव होता. मग आमच्यासमोरच ते इतर कलाकारांना फोन लावायचे आणि आमचंही बोलणं करून द्यायचे. मला त्यांचा स्वभाव खूप आवडायचा. मला असं वाटायचं की, बापरे, ज्यांच्याबद्दल एवढं लिहून येतं, ते बाळासाहेब ठाकरे माझ्या शेजारी राहतात. त्यांचं मला रोज दर्शन होतं, म्हणजे मी किती भाग्यवान आहे. 'महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे' असंच ते समीकरण होतं."
वर्षा उसगावकर आजही मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. 'स्टार प्रवाह'वरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' यामध्ये त्यांनी भूमिका साकारली. या वयातही त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य हे कौतुकाचा विषय आहे. बाळासाहेबांसोबतच्या या खास आठवणी शेअर करून वर्षा उसगावकर यांनी पुन्हा एकदा जुन्या दिवसांना उजाळा दिला आहे.