2026 हे वर्ष सोमनाथ मंदिराच्या इतिहासात एक प्रतीकात्मक टप्पा ठरते. आजपासून साधारण एक हजार वर्षांपूर्वी (इ.स. 1026) गझनीचा सुलतान महमूद गझनी याने सोमनाथावर हल्ला केला होता. हा हल्ला केवळ लुटीसाठी झालेला होता, अशी मांडणी काही इतिहासकारांनी केली असली तरी वास्तव त्याहून अधिक गुंतागुंतीचं आणि क्रूर होतं.
advertisement
कुरुक्षेत्र (1014), मथुरा-कन्नौज (1018) आणि अखेरीस सोमनाथ भारताच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या ठिकाणांवर महमूद गझनीने केलेल्या आक्रमणांमागे केवळ संपत्तीचा मोह नव्हता. स्वतःला इस्लामचा योद्धा म्हणून सादर करण्याची महत्त्वाकांक्षा, मूर्तिभंजनाची कट्टर वृत्ती आणि ‘जिहाद’च्या नावाखाली हिंदू धर्मस्थळांचा विध्वंस ही या मोहिमांची ठळक वैशिष्ट्यं होती.
सोमनाथातील रक्तपात आणि संहार भारताच्या सामूहिक स्मृतीचा भाग झाला आहे. मात्र महमूद गझनी हा शेवटचा आक्रमक नव्हता. पुढील शतकांमध्ये अलाउद्दीन खिलजी, गुजरातचा सुलतान मुझफ्फर शाह पहिला आणि नंतर मुघल सम्राट औरंगजेब, या सर्वांनी वेगवेगळ्या काळात सोमनाथावर हल्ले केले. मंदिर उद्ध्वस्त केलं गेलं, अपवित्र करण्यात आलं; पण प्रत्येक वेळी ते पुन्हा उभं राहिलं. म्हणूनच सोमनाथाची कथा ही विध्वंसाची नव्हे, तर अखंड टिकून राहिलेल्या जिद्दीला आहे.
महमूद गझनीच्या विध्वंसानंतर गुजरातच्या चालुक्य (सोलंकी) वंशातील राजा कुमारपाल यांनी सोमनाथाचं पुनर्निर्माण केलं. मात्र इ.स. 1299 मध्ये अलाउद्दीन खिलजीचा भाऊ आणि सेनापती उलुग खान याने पुन्हा मंदिर जमीनदोस्त केलं आणि त्या जागी मशीद उभारली. तरीही हा अध्याय तिथेच संपला नाही. 14व्या शतकाच्या सुरुवातीला सौराष्ट्रातील चूडासमा घराण्याचे राजा महिपाल पहिला यांनी मंदिर पुन्हा उभारलं. त्यांच्या पुत्राने गर्भगृहात शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. हे मंदिरही 1706 मध्ये औरंगजेबाच्या आदेशाने पुन्हा उद्ध्वस्त करण्यात आलं.
18व्या शतकात राणी अहिल्याबाई होळकर यांनी मूळ मंदिराच्या अवशेषांजवळ एक छोटे मंदिर उभारण्याचा आदेश दिला. प्रत्येक विध्वंसानंतर सोमनाथ नव्याने उभा राहत राहिला, जणू फिनिक्स पक्ष्यासारखा राखेतून पुन्हा जन्म घेत.
सोमनाथाबद्दल हिंदू समाजाच्या भावनांचं एक विलक्षण उदाहरण 13व्या शतकातील पर्शियन इतिहासग्रंथांत आढळतं. मिन्हाज-ए-सिराज जुजानी यांच्या तबकात-ए-नासिरी या ग्रंथात उल्लेख आहे की सोमनाथाच्या विध्वंसानंतर एका संतप्त हिंदू मार्गदर्शकाने महमूद गझनीच्या सैन्याला परतीच्या प्रवासात वाळवंटात भरकटवलं. पाण्याचा थेंबही न मिळणाऱ्या प्रदेशात सैन्य अडकवण्यामागे त्याचा उद्देश स्पष्ट होता. सोमनाथाचा अपमान आणि संहार याचा बदला. हा मार्गदर्शक अखेरीस मारला गेला, पण त्याचं शौर्य इतिहासात कोरलं गेलं.
मुहम्मद उफी यांच्या जामी-उल-हिकायत या ग्रंथात तर दोन हिंदू मार्गदर्शकांचा उल्लेख आहे, तर फिरिश्ता (17वे शतक) यांच्या मते तो मार्गदर्शक सोमनाथ मंदिराचा पुजारी होता. तपशील वेगवेगळे असले, तरी एक गोष्ट निर्विवाद आहे. सोमनाथाचा विध्वंस हिंदूंना खोलवर जखमी करून गेला आणि त्या वेदनेतून प्रतिकार जन्माला आला.
दुर्दैवाने आधुनिक काळातील अनेक इतिहासपुस्तकांनी आक्रमणांची नोंद केली; पण हिंदू समाजाने दाखवलेल्या प्रतिकार, धैर्य आणि पुनर्निर्माणाच्या जिद्दीला फारसं स्थान दिलं नाही. भारताचा इतिहास फक्त पराभवांचा नाही; तो सातत्याने उभं राहणाऱ्या समाजाचाही आहे.
711 मध्ये सिंधवर मुहम्मद बिन कासिमच्या आक्रमणानंतर तब्बल 350 वर्षे अरब आक्रमक भारतात खोलवर का शिरू शकले नाहीत? गझनवी आणि घुरी आक्रमणांमध्ये मोठी पोकळी का दिसते? काश्मीरचे कर्कोटक, वलभीचे मैत्रक, नवलसारिकेचे चालुक्य, माळव्याचे गुर्जर-प्रतिहार, मेवाडचे गुहिल या हिंदू राजवंशांनी अरब आक्रमकांना दिलेला कडवा प्रतिकार याचं उत्तर देतो.
स्वातंत्र्यानंतर सोमनाथाने पुन्हा एक ऐतिहासिक वळण घेतलं. नोव्हेंबर 1947 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिराच्या भग्न अवस्थेचं दर्शन घेतलं आणि पुनर्निर्माणाचा संकल्प केला. जूनागढचे महाराजा दिग्विजयसिंहजी जाडेजा (जामसाहेब) यांनी आर्थिक मदत दिली. 1949 मध्ये ट्रस्ट स्थापन झाला आणि 8 मे 1950 रोजी पायाभरणी, तर 11 मे 1951 रोजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. विशेष म्हणजे हे पुनर्निर्माण पूर्णपणे जनसहभागातून झालं.
आज सोमनाथ मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही. ते हिंदू समाजाच्या जिद्दीचं, स्मरणशक्तीचं आणि पुनरुत्थानाचं प्रतीक आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरासोबत उभं असलेलं सोमनाथ भारताला आठवण करून देतं, हा देश केवळ आक्रमणांचा बळी नव्हता, तर प्रत्येक संकटातून उभा राहणारी एक जिवंत, सशक्त आणि आत्मविश्वासी संस्कृती आहे.
(डॉ. चांदनी सेनगुप्ता या दिल्ली विद्यापीठाच्या श्री अरबिंदो कॉलेजमध्ये इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत. वरील लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून ती केवळ लेखकाची आहेत. ती News18 च्या मतांचे प्रतिनिधित्व करतातच असे नाही.)
