काय आहे संपूर्ण प्रकरण?
लीलावती रुग्णालयाला चालवणाऱ्या ट्रस्टने ईडी (प्रवर्तन निदेशालय) आणि मुंबई पोलिसांच्या बांद्रा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये माजी ट्रस्टींनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. हे घोटाळे रुग्णालयाच्या आर्थिक हिशेबांचे फॉरेंसिक ऑडिट करताना समोर आले.
ट्रस्टने आरोप केला आहे की, माजी ट्रस्टींनी रुग्णालयाच्या उत्पन्नाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला आणि आर्थिक हेराफेरी केली. एवढेच नाही, तर त्यांनी रुग्णालयात काही ठिकाणी काळा जादूही केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
advertisement
कोण होत्या लीलावती?
लीलावती रुग्णालयाची स्थापना प्रसिद्ध हिरे व्यापारी कीर्तिलाल मेहता यांनी आपल्या पत्नी लीलावती यांच्या स्मरणार्थ केली होती. कीर्तिलाल मेहता यांनी 1978 मध्ये मुंबईत एक उच्च दर्जाचे रुग्णालय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले आणि 1997 मध्ये लीलावती रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. आज हे रुग्णालय मुंबईतील सर्वात मोठे आणि नामांकित रुग्णालयांपैकी एक आहे.
कुटुंबातील अंतर्गत कलह आणि आर्थिक गैरव्यवहार
लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या व्यवस्थापनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबातील वाद सुरू आहेत. 2002 मध्ये ट्रस्टचे संस्थापक किशोर मेहता आजारी पडले आणि उपचारासाठी परदेशी गेले. त्यानंतर त्यांचा भाऊ विजय मेहता यांनी ट्रस्टची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.
मात्र 2006 मध्ये विजय मेहता यांनी बनावट सही करून आपल्या मुलांना आणि भाच्यांना ट्रस्टी बनवले आणि किशोर मेहता यांना ट्रस्टमधून काढून टाकले. अखेर 2016 मध्ये किशोर मेहता यांनी पुन्हा ट्रस्टचा ताबा घेतला आणि तब्बल आठ वर्षे त्यांनी ट्रस्टचे नेतृत्व केले. मात्र, 2024 मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रशांत मेहता स्थायी ट्रस्टी बनला. प्रशांत मेहता यांनी ट्रस्टच्या आर्थिक हिशेबांची चौकशी केली आणि या घोटाळ्याचा पर्दाफाश केला.
हिरे व्यापार ते सामाजिक सेवेपर्यंतचा प्रवास
कीर्तिलाल मेहता हे भारताच्या श्रीमंत उद्योजकांपैकी एक होते. त्यांनी फक्त 12 वर्षांची असताना बर्मामध्ये (सध्याच्या म्यानमार) रुबी व्यापार सुरू केला होता. नंतर ते मुंबईत आले आणि 1944 मध्ये ‘ब्यूटीफुल डायमंड्स’ नावाने हिरे व्यवसाय सुरू केला.
1953 मध्ये बेल्जियमच्या अँटवर्प शहरात ‘जेमबेल डायमंड्स’ कंपनी स्थापन केली आणि त्यानंतर जगभर हिरे व्यापार वाढवला. त्यांनी हाँगकाँग , तेल अवीव, न्यूयॉर्क, आणि इतर देशांमध्येही व्यवसाय विस्तारला.
व्यवसायात यश मिळवल्यानंतर कीर्तिलाल मेहता यांनी सामाजिक कार्याकडेही लक्ष दिले. त्यातूनच त्यांनी लीलावती रुग्णालयाची स्थापना केली आणि हे रुग्णालय आजही लाखो लोकांना उत्तम वैद्यकीय सेवा पुरवत आहे.
आता पुढे काय?
या घोटाळ्याची चौकशी आता प्रवर्तन निदेशालय (ED) आणि मुंबई पोलिसांच्या पथकांकडून सुरू आहे. लवकरच या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. लीलावती रुग्णालयाच्या नावाने सुरू असलेल्या या गैरव्यवहारामुळे अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.