देशात याआधी कोरोना विषाणूच्या तीन लाटांचा अनुभव आला आहे. त्या काळात आजाराची तीव्रता इतकी होती की मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. त्यानंतर सरकारने मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली आणि मोठ्या लोकसंख्येला लस देण्यात आली. आता प्रश्न असा निर्माण होतो की, 2022 पर्यंत देण्यात आलेल्या लसी नव्या कोरोना व्हेरिएंटवर प्रभावी ठरतील का? आणि या नव्या व्हेरिएंटमुळे नवी लाट येण्याची शक्यता आहे का?
advertisement
JN.1 व्हेरिएंट म्हणजे काय?
सध्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सिंगापूरमध्ये ज्या नमुन्यांचे जीनोम विश्लेषण करण्यात आले त्यात बहुतांश रुग्ण JN.1 व्हेरिएंटचे होते. हा JN.1 व्हेरिएंट नवा नाही. हा ओमिक्रॉनचा एक सब-वेरिएंट आहे. जो काही वर्षांपूर्वीच आढळला होता.
दिल्ली AIIMS मधील सामुदायिक वैद्यकीय विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय राय, जे कोवॅक्सिन लसीच्या सर्व तीन टप्प्यांतील मुख्य संशोधक होते. डॉ. संजय राय म्हणाले, JN.1 हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा एक सब-वेरिएंट आहे. त्याची ओळख एक वर्षापूर्वी झाली होती. तो नवा नाही. तो गंभीर आहे की नाही, याची माहिती आपल्याकडे आहे.
ते म्हणाले, JN.1 पासून घाबरण्याची गरज नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार, तो सर्वसामान्य सर्दी-खोकल्याइतका सौम्य किंवा त्याहून सौम्य असू शकतो.
काय तो धोका? आणि काय काळजी घ्यावी?
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि महाराष्ट्र सरकारच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले की, हा व्हेरिएंट ओमिक्रॉनपेक्षा सौम्य आहे. मात्र तो झपाट्याने पसरतो. जर एखादी व्यक्ती संक्रमित झाली. तर ती इतर अनेकांना लवकर संक्रमित करू शकते. पण परिस्थिती गंभीर नाही. त्यामुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही.
कोणी काळजी घ्यावी
जे लोक संक्रमित झाले आहेत, त्यांनी इतरांपासून अंतर ठेवावे आणि आपल्याकडून इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.
जुनी लस नव्या व्हेरिएंटवर परिणामकारक?
पूर्वी कोरोना विषाणूने जगभरात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला होता. लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती.
लोकांना मुख्यतः कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसी दिल्या गेल्या. काहींना रशियन स्पुटनिक लस दिली गेली.पण दोन-तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या लसी सध्याच्या व्हेरिएंटवर परिणामकारक ठरतील का?
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ज्यांनी दोन डोस आणि बूस्टर डोस घेतले आहेत. त्यांना थोडा फायदा होईल. ही लस मूळ विषाणूविरोधात तयार करण्यात आले होते. तेही पूर्णतः प्रभावी नव्हते.
लस घेतल्यामुळे संसर्ग होणार नाही, असं नाही. पण संसर्ग झाला, तरी लक्षणं सौम्य राहतात. ज्यांनी फक्त एक किंवा दोन डोस घेतले आहेत त्यांची प्रतिकारशक्ती कमी असू शकते. लसीचा फायदा होईल, पण फक्त त्यांना ज्यांना दोन डोस आणि एक बूस्टर डोस दिला आहे.
डॉ. गावंडे म्हणतात की, मागील लसी सध्याच्या व्हेरिएंटवर काम करणार नाहीत. त्यांच्या मते, कोरोनाविरुद्ध दरवर्षी लस घ्यावी लागेल. कारण नवे व्हेरिएंट्स जुन्या लसींवर परिणाम करत नाहीत. जसे फ्लूच्या लसीसाठी दरवर्षी नवीन लस तयार केली जाते, तसेच कोरोना विषाणूसाठीही करावे लागेल.
त्यांनी सांगितले की, ज्यांच्यात जुन्या लसीमुळे प्रतिकारशक्ती आहे. त्यांना सध्याच्या व्हेरिएंटशी लढायला मदत होईल. नवीन लस बनवणे खर्चिक असल्यामुळे प्रत्येक वेळी नवीन लस तयार करणे शक्य नाही.
नवा व्हेरिएंट आणि लाट येण्याची शक्यता
तज्ज्ञ म्हणतात की, कोरोना व्हेरिएंट झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे लोक विचार करत आहेत की, नवीन लाट येईल का? डॉ. गावंडे म्हणतात, यावेळी नवीन लाट येण्याची शक्यता कमी आहे.
त्यामागे ते तीन कारणे सांगतात:
-देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. त्यामुळे काही प्रतिकारशक्ती आहे.
-हा व्हेरिएंट झपाट्याने पसरतो, पण त्याची तीव्रता कमी आहे. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात.
-अनेक वेळा लोकांना कळतही नाही की, ते संक्रमित आहेत.
त्यांच्या मते, हा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा सब-वेरिएंट आहे. लक्षणं सौम्य आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. जर रुग्णसंख्या वाढली, तरी अशी परिस्थिती येणार नाही की लोकांना मोठ्या प्रमाणात रुग्णालयात भरती करावं लागेल. लक्षणं सौम्य आहेत, मृत्यूदर कमी आहे. नवीन लाट येईल का, यावर निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र ज्यांना आधीपासूनच इतर आजार आहेत, त्यांनी सावध राहणे आवश्यक आहे.