7 वर्षापूर्वी काय घडले होते?
डोंबिवलीतील डी. एन. सी. शाळेत कार्यरत असलेले शिक्षक प्रभाकर जीवराम ठोके (वय 55) यांचा सात वर्षांपूर्वी घरडा सर्कल चौक येथे दुचाकीवरून जात असताना कचरा वाहून नेणाऱ्या डम्परखाली येऊन मृत्यू झाला होता.
या अपघातप्रकरणी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने शिक्षक ठोके यांच्या वारसांना तब्बल 82 लाख 45 हजार 153 रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. न्यायाधिकरणाच्या सदस्या रूपाली मोहिते यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ही भरपाई संयुक्तपणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि संबंधित डम्परची विमा कंपनी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी यांनी द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
हा डम्पर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली खासगी तत्त्वावर कार्यरत मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस या एजन्सीकडून चालवला जात होता. डम्परचा चालक खासगी असल्याने त्याची जबाबदारी आमची नाही असा दावा पालिका प्रशासनाने न्यायाधिकरणासमोर केला होता. मात्र न्यायाधिकरणाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.
न्यायाधिकरणाने स्पष्ट केले की संबंधित डम्पर आणि चालक हे पालिकेच्या नियंत्रणाखाली काम करत होते. अपघातासाठी डम्पर चालकाची 85 टक्के चूक असल्याचे मत नोंदवत पालिका प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही असे ठामपणे नमूद करण्यात आले. या निकालामुळे अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
