लाल सोन्यानं मार्केट खाल्लं! डाळिंबाला उच्चांकी दर, पुण्यात किलोला किती मिळाला भाव? Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pomegranate Price: पुणे बाजारातील व्यापाऱ्याच्या मते 26 जानेवारीपर्यंत डाळिंबाचे हे दर कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे.
पुणे : आरोग्यदायी गुणधर्मांमुळे डाळिंबाला नेहमीच बाजारात मोठी मागणी असते. बारा महिने बाजारपेठेत मागणी असलेल्या डाळिंबाला सध्या पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात उच्चांकी दर मिळत आहे. आवक घटल्याने आणि दर्जेदार फळ उपलब्ध झाल्याने डाळिंबाच्या दरात मोठी वाढ झाली असून प्रतिकिलो तब्बल 600 रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे मार्केट यार्डात डाळिंबाची सध्या मर्यादित आवक होत आहे. पूर्वी जिथे दररोज 50 ते 60 टन डाळिंबाची आवक व्हायची, तिथे आता ही आवक 25 ते 30 टनांवर आली आहे. हवामानातील बदल, अवकाळी पावसाचे परिणाम आणि उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे आवक लक्षणीयरीत्या घटली आहे. मात्र, जे डाळिंब बाजारात येत आहे, ते दर्जेदार आणि वजनदार असल्याने व्यापाऱ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
गुलटेकडी मार्केट यार्डातील नामांकित डाळिंब अडतदार संजय अनपट यांच्या गाळ्यावर झालेल्या लिलावात उच्च दर्जाच्या डाळिंबाला विक्रमी दर मिळाला. या गाळ्यावर 700 ते 800 कॅरेट इतकी आवक झाली होती. 500 ते 600 ग्रॅम वजनाच्या फळांना मोठी मागणी होती. अडत पेढीच्या लिलावात उत्कृष्ट प्रतीच्या डाळिंबाला प्रतिकिलो 605 रुपये असा दर मिळाला.
advertisement
विशेष म्हणजे, सध्या बाजारात भगवा जातीचे डाळिंब मोठ्या प्रमाणावर येत आहे. या जातीचे डाळिंब रंग, चव आणि टिकाऊपणासाठी प्रसिद्ध असल्याने देशांतर्गत तसेच निर्यातीसाठीही याला चांगली मागणी असते. काही ठिकाणी 800 ग्रॅम वजनाच्या डाळिंबाला प्रतिकिलो तब्बल 605 रुपये इतका विक्रमी भाव मिळाल्याची नोंद समितीमध्ये झाली आहे. अशी माहिती डाळिंबाचे व्यापारी श्रीपाद अनपट यांनी दिली आहे.
advertisement
आवक कमी आणि गुणवत्ता उत्कृष्ट असल्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठे दर दिल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांना चांगला आर्थिक दिलासा मिळाला आहे. बाजारातील व्यापाऱ्याच्या मते 26 जानेवारीपर्यंत डाळिंबाचे हे दर कमी होण्याची शक्यता कमी असून पुढील काही दिवस तरी उच्च दर कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 1:47 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
लाल सोन्यानं मार्केट खाल्लं! डाळिंबाला उच्चांकी दर, पुण्यात किलोला किती मिळाला भाव? Video








