पुणे मार्केट यार्डात डाळिंबाची सध्या मर्यादित आवक होत आहे. पूर्वी जिथे दररोज 50 ते 60 टन डाळिंबाची आवक व्हायची, तिथे आता ही आवक 25 ते 30 टनांवर आली आहे. हवामानातील बदल, अवकाळी पावसाचे परिणाम आणि उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे आवक लक्षणीयरीत्या घटली आहे. मात्र, जे डाळिंब बाजारात येत आहे, ते दर्जेदार आणि वजनदार असल्याने व्यापाऱ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा, सोयाबीन दर घसरले, तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
गुलटेकडी मार्केट यार्डातील नामांकित डाळिंब अडतदार संजय अनपट यांच्या गाळ्यावर झालेल्या लिलावात उच्च दर्जाच्या डाळिंबाला विक्रमी दर मिळाला. या गाळ्यावर 700 ते 800 कॅरेट इतकी आवक झाली होती. 500 ते 600 ग्रॅम वजनाच्या फळांना मोठी मागणी होती. अडत पेढीच्या लिलावात उत्कृष्ट प्रतीच्या डाळिंबाला प्रतिकिलो 605 रुपये असा दर मिळाला.
विशेष म्हणजे, सध्या बाजारात भगवा जातीचे डाळिंब मोठ्या प्रमाणावर येत आहे. या जातीचे डाळिंब रंग, चव आणि टिकाऊपणासाठी प्रसिद्ध असल्याने देशांतर्गत तसेच निर्यातीसाठीही याला चांगली मागणी असते. काही ठिकाणी 800 ग्रॅम वजनाच्या डाळिंबाला प्रतिकिलो तब्बल 605 रुपये इतका विक्रमी भाव मिळाल्याची नोंद समितीमध्ये झाली आहे. अशी माहिती डाळिंबाचे व्यापारी श्रीपाद अनपट यांनी दिली आहे.
आवक कमी आणि गुणवत्ता उत्कृष्ट असल्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठे दर दिल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांना चांगला आर्थिक दिलासा मिळाला आहे. बाजारातील व्यापाऱ्याच्या मते 26 जानेवारीपर्यंत डाळिंबाचे हे दर कमी होण्याची शक्यता कमी असून पुढील काही दिवस तरी उच्च दर कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





