कल्याण-मुरबाड एसटी प्रवासाची दैना
इतकी रोजची गर्दी असूनही या मार्गावर पुरेशा एसटी बस गाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतहा मुरबाडहून सकाळी 7 ते 10 आणि कल्याणहून सायंकाळी 5 ते रात्री 10 या गर्दीच्या वेळेत बसची संख्या अपुरी असल्याची तक्रार आहे. वेळेवर बस न मिळाल्याने अनेक प्रवाशांना खासगी इको, कार किंवा जीपने प्रवास करावा लागतो.
advertisement
बस अभावी सवलतीचा लाभ मिळेना
यामुळे प्रवासाचा खर्च वाढत असून सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये 50 टक्के तिकीट सवलत मिळते. मात्र बसच उपलब्ध नसल्याने या प्रवाशांना सवलतीचा लाभ घेता येत नाही आणि महागडा प्रवास करावा लागतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या मते मुरबाड- कल्याण मार्गावरील बस सर्व थांब्यांवर थांबत असल्याने थेट प्रवास करणारे प्रवासी इतर पर्याय निवडतात. त्यामुळे बस असूनही अपेक्षित प्रवासी मिळत नाहीत.
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे बहुतांश काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे बस वेळेत पोहोचू शकतात. या पार्श्वभूमीवर दिवसभरात बस फेऱ्या वाढवाव्यात तसेच मुरबाड आणि कल्याण आगारातून विना वाहक जलद एसटी बस सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
