आनंदाच्या क्षणीच काळाचा घाला
कल्याण पश्चिमेकडील भागात राहणारे संजित बाविस्कर यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. शनिवारी सायंकाळी तिचा हळदी समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. पाहुण्यांसाठी कॅटररमार्फत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
जेवण केले अन् उलट्या-जुलाब सुरू
मात्र जेवण झाल्यानंतर रात्री उशिरा अनेक पाहुण्यांना अचानक उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. वधू स्नेहा, तिची आई रेखा आणि बहिणीलाही याच त्रासाला सामोरे जावे लागले. प्रकृती खालावल्याने अनेकांना तातडीने कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड येथील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. जवळपास जेवणातून सुमारे 150 पाहुण्यांना विषबाधा झालेली आहे अशी माहिती समोर येत आहे.
advertisement
या घटनेत काही कॅटरर्सचे कर्मचारीसुद्धा आजारी पडल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात हळदी समारंभातील जेवणातूनच विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अनेक रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असून काहींची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याने उपचार सुरू आहेत.
या धक्कादायक घटनेमुळे आणि मानसिक तणावामुळे रविवारी होणारे लग्न रद्द करण्याचा कठीण निर्णय कुटुंबीयांना घ्यावा लागला. या प्रकरणी कॅटररच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वधूचे वडील यांनी खडकपाडा पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
