रविवारी दुपारी अमरपूर बस स्थानक नेहमीप्रमाणे गजबजलेलं होतं. प्रवासी आपल्या बसची वाट पाहत होते, पण अचानक एका 60 वर्षांच्या महिलेला आणि 35 वर्षांच्या तरुणाला काही लोकांनी गराडा घातला. हा जमाव केवळ बघ्यांचा नव्हता, तर त्यात त्या महिलेचा स्वतःचा पती आणि मुलगा होता. आपल्या हसत्या-खेळत्या कुटुंबाला सोडून आई एका परक्या तरुणासोबत जात असल्याचं पाहून मुलाचा संयम सुटला आणि तिथेच मारहाण सुरू झाली. भर चौकात सुरू असलेल्या या राड्यामुळे या 'अनोख्या' प्रेमकहाणीचा पडदा उघडला गेला.
advertisement
चार महिन्यांपूर्वीचा तो 'राँग नंबर'
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती एका चुकीच्या फोन कॉलने. आरा येथील 35 वर्षीय तरुण वकील मिश्रा आणि बांका येथील या 60 वर्षीय महिलेचा संपर्क एका राँग नंबरमुळे झाला. सुरुवातीला साधी ओळख झाली, पण फोनवरच्या गप्पा कधी प्रेमात बदलल्या हे दोघांनाही कळलं नाही. वयाचं अंतर मोठं होतं, पण प्रेमाची ओढ त्यापेक्षाही जास्त तीव्र ठरली.
या दोघांच्या प्रेमाचा प्रवास इतका वेगवान होता की, अवघ्या चार महिन्यात त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही आपापल्या घरातून निघाले, भागलपूर रेल्वे स्थानकावर भेटले आणि तिथून थेट लुधियाना गाठलं. तिथे त्यांनी रीतसर लग्न केलं आणि काही दिवस पती-पत्नी म्हणून संसारही केला.
जेव्हा पोलिसांनी आणि कुटुंबियांनी महिलेला जाब विचारला, तेव्हा तिने अत्यंत ठामपणे आपलं म्हणणं मांडलं. "आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि लुधियानामध्ये आमचं लग्न झालं आहे," असं तिने भर पोलीस ठाण्यात सांगितलं. दुसरीकडे, 60 वर्षांच्या पत्नीने आणि आईने असा निर्णय घेतल्यामुळे पती आणि मुलाचा रडवेल्या अवस्थेतला अवतार पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचं मन हेलावलं.
अमरपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख पंकज कुमार झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हे प्रेमी जोडपे पोलीस संरक्षणात आहे. कुटुंबातील सदस्यांनी या नात्याला कडाडून विरोध केला असून परिसरात या लग्नाचीच चर्चा रंगली आहे. 'प्रेम आंधळं असतं' हे खरं, पण जेव्हा ते सामाजिक आणि कौटुंबिक चौकटी मोडून बाहेर येतं, तेव्हा निर्माण होणारे प्रश्न मात्र अनुत्तरित राहतात.
