मुंबई: निसर्गाच्या सानिध्यात राहायला सर्वांनाच आवडतं. पण आजच्या या सिमेंटच्या पसाऱ्यात निसर्गातील एकांताच्या जागा तशा फार कमीच आहेत. तसेच वनराई लुप्त होत असताना हिरवाईशी मैत्री जोपासण्याची अनोखी किमया एका सोसायटीतील इमारतीच्या गच्चीवर करण्यात आली आहे. मुंबईतील कांजूरमार्ग पूर्व येथे 'आर्केड अर्थ डेफोडाईल' नावाच्या सोसायटीतील एका इमारतीच्या गच्चीवर हिरवागार निसर्ग निर्माण करण्यात आलाय.
advertisement
पर्यावरणपूरक इमारत या संकल्पनेतून इमारतीच्या गच्चीवर छोटसं हिरवंगार उद्यान तयार करण्यात आलं आहे. या गार्डनमध्ये वेगवेगळ्या जातीचे फुलझाडं लावण्यात आली आहेत. फळझाडे लावण्यात आली आहेत. एवढच नाही तर लहानमुलांसाठी स्टडी टेबल ठेवण्यात आले आहेत. मोठ्यांसाठीही टेबल, खूर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांसाठी तर ही जागा म्हणजे पर्वणीच आहे आणि मोठ्यांसाठीही एक हक्काची विश्रांतीची जागा आहे.
नवीन वर्षातील जिमचा संकल्प मोडला? मग घरीच करा ही 7 सोपी योगासने, Video
टेरेसवर ग्रंथालय
अनेकजण संध्याकाळी कामावरून दमून आल्यावर शांत, एकांत मिळण्यासाठी, पुन्हा स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी गच्चीतील या हिरवळीवर येऊन वेळ घालवतात. इमारतीच्या गच्चीवर फक्त गार्डनच नाही तर त्यासोबत सौरऊर्जा पॅनलही बसवण्यात आलं आहे. हे पॅनल पृष्ठभागावर न बसवता वर छप्परांसारखे बसवल्याने खालची जागा मोकळी मिळाली. त्याच जागेत बोन्साय झाडे लावण्यात आली आहे. एवढच नाही तर टेरेसच्या बाजूला एक छोटं ग्रंथालयही तयार केलं आहे.
टेरेस गार्डनचं नाव एकांत
ही संकल्पना संस्थेचे पदाधिकारी संदीप दर्पेल यांची असून या टेरेस गार्डनचे उद्घाटन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. दरम्यान या हिरव्यागार टेरेस गार्डनचं नाव 'एकांत' ठेवण्यात आलं आहे. गार्डनमध्ये वेगवेगळ्या फुलांची आणि फळांची झाडे लावण्यात आली आहेत. यात चिकू, आंबा, पेरूची रोपं लावण्यात आली आहेत, या अडीच फुटाच्या झाडाला किमान 20 फळे येतात.
Health Tips : लेझरने हेअर रिमूव्ह करताय? आधी फायदे आणि तोटे पाहाच Video
सोसायटीत एकूण 8 टॉवर आहेत. सगळ्या टॉवरमधील सदस्यांची संख्या लक्षात घेता सगळ्यांसाठी असलेलं एक उद्यान पुरेसं नाही ही बाब लक्षात घेऊन यातील 'डी' विंगच्या गच्चीवर टेरेस गार्डन संकल्पना राबवण्यात आली. इमारतीची हिरवीगार गच्ची सर्वांसाठीच एक मोकळा श्वास झालीये. कामावरून दमून आल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात जाता यावं, दिवसभराचा थकवा दूर होऊन पुन्हा ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी गच्चीवरील उद्यानाची संकल्पना सुचली, असं संदीप दर्पेल यांनी सांगितलं.
इमारतीमधील सदस्य त्यांच्या सोयीनुसार मिळेल त्या वेळेत टेरेस गार्डनवर येतात. कोणी एकांतासाठी येतात, कोणी योगा करायला, कोणी पुस्तक वाचायला तर कोणी फुलांचं-फळांचं निरिक्षण करायला येतात. मुंबईतील धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाच्या घराजवळ किंवा इमारतीवर असा निसर्गाचा एकांत मिळाला तर किती बरं होईल. 'आर्केड अर्थ डेफोडाईल' सारख्याच अशा अनेक इमारतींची गच्ची हिरवीगार होणार असेल तर मुंबईतही निसर्गाचा गारवा नक्कीच अनुभवता येईलं.