रक्तदाब वाढतो पण...
नवी दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयातील प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालिका डॉ. सोनिया रावत यांनी न्यूज18 ला सांगितलं की, कॉफीमध्ये कॅफिन नावाचा घटक असतो, जो एक उत्तेजक म्हणून काम करतो. कॉफी प्यायल्यानंतर जेव्हा कॅफिन रक्तात मिसळतं तेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे काही काळ रक्तदाब वाढतो. मात्र, थोड्या वेळानंतर हा वाढलेला रक्तदाब सामान्य होतो. त्यामुळे कॉफीचं सेवन मर्यादेत केलं तर तर उच्च रक्तदाबाचा आजार होण्याचा धोका राहत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच हायब्लडप्रेशरचा त्रास असेल किंवा एखाद्या व्यक्तीला चहाप्रमाणे कॉफी पिण्याचं व्यसन असेल तर त्यांच्यासाठी जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन धोक्याचं ठरू शकतं.
advertisement
नियमीत कॉफी पिण्याचा फायदा की तोटा ?
कॉफी प्यायल्याने रक्तदाबात तात्पुरती वाढ जरी होत असली, तरीही ज्या व्यक्ती नियमितपणे कॉफी पितात, त्यांच्या शरीरात कॅफिनसाठीची सहनशीलता विकसित होते आणि कालांतराने त्यांच्या रक्तदाबात वाढ न होता त्यांचा रक्तदाब स्थिर राहायला सुरूवात होते. मात्र एखाद्या व्यक्तीला कॅफिनची ऍलर्जी असेल किंवा ती व्यक्ती जास्त प्रमाणात कॉफी पित असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. सतत किंवा अतिप्रमाणात कॉफी प्यायल्यामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात. याशिवाय कॅफेन हे एक उत्तेजक असल्यामुळे झोप किंवा घालवण्यासाठी कॉफी प्यायली जाते. मात्र अतिकॉफीसेवनामुळे निद्रानाशाचा त्रास होण्याची सुद्धा शक्यता असते.
गर्भवती महिलांसाठी धोक्याची कॉफी
अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की, गर्भवती महिलांसाठी कॉफीचं सेवन करणं धोक्याचं ठरू शकतं. गरोदरपणात कॅफीनचे जास्त सेवन केल्याने बाळांचा मुदतपूर्व जन्म, किंवा कमी वजनाचं बाळ जन्माला येणं अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय काही प्रमाणात गर्भपाताची भीती सुद्धा असते. याशिवाय अति कॉफीसेवनामुळे गर्भाच्या विकासावर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
ॲसिडिटीचा त्रास असलेल्यांनी टाळावी कॉफी
कॉफीमध्ये असलेले कॅफिन आणि ॲसिड पोटात ॲसिडचं उत्पादन वाढवतात. ज्यामुळे छातीत जळजळ आणि ॲसिड रिफ्लक्सची शक्यता वाढते. त्यामुळे ज्यांना पित्त, ॲसिडिटीचा त्रास आहे अशांनी कॉफीचं सेवन टाळणं त्यांच्या हिताचं
ठरू शकतं.