ही भाजणी केवळ पौष्टिकच नाही, तर सहा महिने टिकणारी देखील आहे, आणि ती तुम्ही कोणत्याही ऋतूत बनवू शकता, कोणत्याही प्रिजर्वेटिव्हशिवाय. येथे एक किलोच्या प्रमाणात कुरकुरीत आणि खुसखुशीत चकलीची भाजणी कशी करायची, याची स्टेप बाय स्टेप रेसिपी दिली आहे.
खुसखुशीत चकलीची भाजणी बनवण्याची कृती..
भाजणीसाठी लागणारे साहित्य
तांदूळ - अर्धा किलो (पाण्याने धुवून सुती कपड्यावर सावलीत वाळत घालावेत).
advertisement
हरभऱ्याची डाळ - 1 वाटी
मुगाची डाळ - 1 वाटी
उडीद डाळ - 1 वाटी
फुटाण्याची डाळ - 1 वाटी (असल्यास वापरा)
पोहे - 1 वाटी
शाबू तांदूळ (कच्चे) - 1 वाटी
भाजणीसाठी मसाला - 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धणे (हलके गरम करून नंतर दळणात घालावे)
भाजणीतील घटक कसे भाजावे
तांदूळ भाजणे : सर्वप्रथम, तांदूळ मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे. तांदूळ काळे पडणार नाहीत याची काळजी घ्या. भाजताना सारखं हालवत राहावे, म्हणजे कोणताही घटक चिकटत नाही आणि करपत नाही.
डाळी आणि इतर साहित्य : मूग, हरभरा, उडीद या डाळी वेगवेगळ्या खमंग भाजून घ्यायच्या आहेत. कारण एकत्र भाजल्यास काही डाळी हलक्या असल्याने त्या करपू शकतात. भाजणीचा रंग आणि चव बिघडू शकते.
पोहे आणि शाबू : पोहे देखील साधारण गरम आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत. याचसोबत शाबूचे तांदूळ देखील भाजून घ्यायचे आहेत.
भाजणी तयार करताना घ्या ही काळजी..
- भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून थंड करा आणि गिरणीतून दळून आणा.
- भाजणी दळून आणण्याआधी घरी असलेले अर्धा किलो तांदूळ आधी गिरणीतून दळून घ्यावे आणि त्यानंतर भाजणी दळून घ्यावी.
- यामुळे भाजणीचे पीठ सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकते, त्याला कसलाही कुबट वास येत नाही आणि तयार केलेल्या चकल्या जास्त तेल शोषून घेत नाहीत, त्या कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत होतात.
- चकलीची भाजणी कधीही गव्हाच्या पिठावर दळायची नाही. यामुळे चकली चिवट होते आणि लगेच मऊ पडते.
चकल्या कशा बनवाव्यात?
- तयार भाजणीच्या पिठात चवीनुसार तिखट, मीठ, कोणताही चकली मसाला, पांढरे तीळ आणि वरून चार चमचे गरम मोहन (तेल/तूप) घालावे. पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे.
- पीठ मळून घेऊन चकल्या सोऱ्यातून म्हणजेच साच्यातून काढून घ्याव्यात.
- तेल मध्यम आचेवर गरम करून त्यात चकल्या मध्यम गॅसवर तळाव्यात. त्या सारख्या वर-खाली करू नयेत, नाहीतर त्या तुटतात किंवा नीट भाजत नाहीत.
असा बनवा घरगुती चकली मसाला
लाल तिखट, मीठ, ओवा, तीळ, गरम मसाला, धने पावडर आणि हळद-हिंग एकत्र करून तुम्ही घरीच कमी साहित्यात चकली मसाला बनवू शकता. ही सर्व डाळीयुक्त पौष्टिक चकली भाजणी तुम्ही दिवाळीलाच नाही, तर इतर दिवशीही नक्की ट्राय करू शकता!
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.