आहाराबद्दल काय सांगतं आयुर्वेद?
आयुर्वेदानुसार, जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ राहायचं असेल तर फक्त सकस आणि पौष्टिक आहारच महत्त्वाचा नाहीये तर योग्य वेळी योग्य पदार्थ खाणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दुधात असलेल्या विविध पौष्टिक घटकांमुळे दूध पिण्याने आरोग्याला फायदे होतात. मात्र दूध हे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने प्यायल्यास त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात.
advertisement
दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ ?
आयुर्वेदानुसार, सकाळी दूध पिणं हे लहान मुलांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. तरूण, मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्ती सकाळी नाश्ता करताना दूध पिऊ शकतात. मात्र वृद्ध व्यक्तींना दूधाचे पूर्ण फायदे हवे असतील तर त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणं हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त फायद्याचं आहे. रात्री दूध पिऊन नंतर झोपल्याने पचनसंस्था चांगलं कार्य करते. याशिवाय, झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने झोपेची गुणवत्ता देखील सुधारू शकते. त्यामुळे निद्रानिशाचा आजार असलेल्यांनी रात्री दूध पिऊन झोपण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. रात्री कोमट किंवा गरम दूध प्यावं, तर दिवसा दूध थंड किंवा गरम दूध तुमच्या आवडीनुसार तुम्ही सेवन करू शकता.
एका दिवसात किती दूध प्यावं?
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त दूध प्यायला सुरूवात केली किंवा एकाच दिवशी जास्त दूध प्यायल्यात आणि नंतर दूध पिणं टाळलं तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे दिवसातून 2 ते 3 कप दूध पिणं फायद्याचं ठरू शकतं. जर तुम्ही फुल-क्रीम दूध पीत असाल तर 2 कपापेक्षा जास्त दूध पिणं टाळावं. यामुळे वजन वाढण्याचा त्रास होऊ शकतो.
दुधामुळे शरीराला होतात अनेक फायदे
दुधात आढळणाऱ्या सगळ्या पोषक तत्त्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. याशिवाय दुधात असलेल्या कॅल्शियममुळे हाडांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे अनेकदा आजारपणात दूध पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. सर्दी, खोकल्या सारख्या आजारांवर हळद टाकलेलं दूध पिणं हे कोणत्या औषधापेक्षा कमी नाहीये.