मुंबई : ऋतू बदलला की ताप, सर्दी, खोकला अशा त्रासांनी बहुतांश लोक हैराण होतात. सध्या मुंबईत अशा अनेक रुग्णांमध्ये इन्फ्लूएंझा आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. बदलत्या तापमानामुळे या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डॉ. कुशल बांगर यांनी या आजाराविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.
इन्फ्लूएंझा म्हणजे काय?
डॉ. बांगर यांच्या मते, इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा तीव्र श्वसन संक्रमणाचा आजार आहे. शिंकणे, खोकणे यासारख्या कृतीतून हा विषाणू एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरतो. या आजारासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे, पण त्याआधी याची लक्षणे ओळखणे आवश्यक आहे.
advertisement
इन्फ्लूएंझाची प्रमुख लक्षणे:
अचानक ताप येणे
कोरडा खोकला
डोकेदुखी
स्नायू आणि सांधेदुखी
घसा खवखवणे
वाहणारे नाक
जुलाब होणे
ही लक्षणे साधारणपणे व्हायरसच्या संसर्गानंतर 2 दिवसांनी दिसून येतात. खोकला काही प्रकरणांमध्ये 2 आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकतो.
उपचार आणि काळजी:
बहुतेक लोक 7 दिवसांत स्वतःहून बरे होतात. सौम्य लक्षणांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खालील गोष्टी केल्यास आराम मिळू शकतो:
संसर्ग पसरू नये म्हणून घरीच राहा.
पुरेशी विश्रांती घ्या.
भरपूर द्रव पदार्थ प्या.
ताप व इतर लक्षणांवर औषधे घ्या.
लक्षणे गंभीर झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ज्यांना गंभीर लक्षणे आहेत, त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि अँटीव्हायरल औषधे घ्यावीत.
संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी:
इन्फ्लूएंझापासून संरक्षणासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्याशिवाय, नियमित हात धुणे, मास्कचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळणे महत्त्वाचे आहे.
डॉक्टरांच्या मते, योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास इन्फ्लूएंझा सहजपणे बरा होतो. त्यामुळे बदलत्या हवामानात सावध राहा आणि तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवा.