एबीपी न्यूजमध्ये दिलेल्या एका वृत्तानुसार, हा अहवाल सूचित करतो की तुमच्या रक्त गटाचा थेट संबंध तुम्हाला साठीपूर्वी स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात येण्याच्या धोक्याशी असू शकतो. तुमचा रक्त गट तुमच्या भविष्यातील आरोग्याच्या धोक्यांबद्दल काय संकेत देतो आणि या नवीन संशोधनातून काय महत्त्वाचे निष्कर्ष मिळाले आहेत, हे सविस्तर जाणून घेऊया.
व्यक्तिचा रक्त गट त्याला कोणत्या आजारांचा धोका आहे हे दर्शवतो, हे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात रक्त गट आणि लवकर येणाऱ्या स्ट्रोक मध्ये थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. संशोधनानुसार, A1 नावाच्या 'A' रक्त गटाच्या लोकांना 60 वर्षांपूर्वी स्ट्रोक येण्याचा धोका जास्त असतो. इतर रक्त गटांसाठी हा धोका कधी आणि कसा असतो.
advertisement
संशोधनातून काय समोर आले?
हा अभ्यास न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून यात जवळपास 48 आनुवंशिक अभ्यासांचा समावेश होता. या अभ्यासांमध्ये 17,000 स्ट्रोक आलेल्या व्यक्ती आणि 6,00,000 स्ट्रोक न आलेल्या व्यक्तींचा समावेश होता, ज्यांचे वय 18 ते 59 वर्षांदरम्यान होते. जीनोम-व्यापी अभ्यासाद्वारे संशोधकांना एक जनुकीय स्थान आढळले, जे लवकर येणाऱ्या स्ट्रोकशी जोडलेले होते आणि त्याचा संबंध रक्त गटाशी होता.
संशोधनातून समोर आले की, A1 उपगट असलेल्या रक्त गटाच्या लोकांना इतर रक्त गटांच्या तुलनेत 16 टक्के अधिक लवकर स्ट्रोक येण्याचा धोका असतो. यामागचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. परंतु 'A1' रक्त गट रक्त गोठवणाऱ्या घटकांवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे पक्षाघाताचा धोका वाढतो, असा संशोधकांचा अंदाज आहे.
तज्ञ काय म्हणतात?
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे (UMSOM) न्यूरोलॉजीचे प्रोफेसर स्टीवन जे. किटनर म्हणाले की, लवकर स्ट्रोक आलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. अशा घटनांमध्ये मृत्यूची शक्यता जास्त असते आणि जे वाचतात त्यांना अनेक दशके अपंगत्वाचा सामना करावा लागतो.
प्रोफेसर स्टीवन पुढे सांगतात की, जनुकीय घटक, ज्यात रक्त गटाचा प्रकार समाविष्ट आहे, विशेषतः तरुण वयात स्ट्रोकचा धोका कमी किंवा जास्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात हे या अभ्यासातून स्पष्ट होते.
संशोधकांना आशा आहे की, ही माहिती धोका असलेल्या व्यक्तींना लवकर ओळखण्यास मदत करेल आणि भविष्यात अधिक लक्ष्यित प्रतिबंधात्मक धोरणे म्हणजेच टार्गेटेड प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज तयार करता येतील.