मुंबईत प्रदूषण वाढतंय. शहरातील वायूप्रदूषण कमी व्हावं यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोळशाच्या भट्टीवरील तंदूर रोटी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 8 जुलैपर्यंत कोळशावरील तंदूर भट्टी बंद करून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे.
परिणामी, मुंबईतील खवय्यांना आता कोळशाच्या भट्टीवरील तंदूर रोटी विसरावी लागणार आहे. त्यासोबत मुंबईतील एकही बेकरी पुढील 6 महिन्यानंतर जळाऊ लाकडावर चालणार नाही, असंही सूचित करण्यात आलं आहे. आतापर्यंत जवळपस 84 ढाबे, रेस्टॉरंट, हॉटेलला पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे.
advertisement
मुंबई उच्च न्यायालयानं 9 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत लाकूड, कोळसा किंवा इतर पारंपरिक इंधन वापरणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार, कोळसा तंदूर भट्टीचा वापर करून तंदूर तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना आता हॉटेलमध्ये बदल करावे लागणार आहेत. कोळसा भट्टीऐवजी इलेक्ट्रिक एलपीजी, पीएनजी, सीएनजी आणि इतर ग्रीन एनर्जीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.