प्रविण थिटे सध्या पुण्यात स्थायिक आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी इलेक्ट्रिशियन आणि वायरमन म्हणून काम केलं. आयटी कार्यालयात बसून काम करणाऱ्या लोकांना पाहून स्वतः काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. शिवाय त्यांच्याकडे पदवीपर्यंतचं शिक्षण देखील नव्हतं. मात्र, त्यांनी माघार घेतली नाही. त्यांनी आयटी क्षेत्रातील शिक्षण घेतलं आणि याच क्षेत्रात प्रवेश केला.
advertisement
प्रविण यांनी तब्बल 17 वर्षे आयटी क्षेत्रात काम केलं. नोकरी करत असताना त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. ते एका कंपनीत ‘ग्लोबल हेड’ या वरिष्ठ पदावर पोहोचले. त्यांना महिन्याला 2.30 लाख रुपये पगार मिळत होता. पण, त्यांच्या मनात कायमच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी 2019 मध्ये ‘ठेचा वडापाव’ या ब्रँडची सुरुवात केली.
पारंपरिक मराठी वडापावला आधुनिक व्यावसायिकतेची जोड देत त्यांनी एक फ्रेंचायझी मॉडेल तयार केलं. केवळ वडापावपुरतं मर्यादित न राहता, 18 प्रकारच्या खाद्यपदार्थांचा यामध्ये समावेश केला. सध्या ठेचा वडापावच्या आउटलेटमध्ये नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण देखील दिलं जातं.
गेल्या आठ महिन्यांत त्यांनी सहा फ्रेंचायझी सुरू केल्या असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या व्यवसायाची आर्थिक उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली आहे. यशाच्या या प्रवासात त्यांनी रेस्टॉरंट व्यवसायाचा सखोल अभ्यास केला आणि प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केलं.
भारतात अनेक फ्रेंचायझी सुरु केल्यानंतर प्रविण थिटे यांनी ऑस्ट्रेलियामध्येही ऑफिस सुरू केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रेंचायझी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. “हा वडापाव फक्त एक स्ट्रीट फूड नाही, तर हा एक अनुभव आहे. तो मला जागतिक स्तरावर पोहोचवायचा आहे,” असं प्रविण म्हणाले.
प्रविण थिटे यांनी केवळ व्यवसाय उभा केला नाही, तर जिद्द, चिकाटी, आणि ध्येयवेडेपणा दाखवून दिला आहे. एका सामान्य इलेक्ट्रिशियनपासून सुरुवात करून जागतिक उद्योजक बनण्याचा त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. त्यांनी दाखवून दिलं की, योग्य वेळ, योग्य विचार आणि आत्मविश्वास असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही.