गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मुंबई महापालिकेच्या महिला बचत गटांनी बनवलेली चविष्ट पुरणपोळी आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. महापालिकेने 50 महिला बचत गटांना एकत्र आणत ‘पुरणपोळी महोत्सव’ सुरू केला आहे. याअंतर्गत मुंबईकरांना 28 मार्चपर्यंत संकेतस्थळावर जाऊन पुरणपोळीची मागणी नोंदविता येईल.
Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ का खातात? तुम्हाला माहितीये का कारण?
advertisement
स्वयंपाकघरातील पारंपरिक चव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम साधत, महापालिकेने ‘पुरणपोळी महोत्सवा’च्या निमित्ताने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे तुमच्या पाडव्याचा गोडवा दुपटीने वाढणार आहे. ग्राहक एकावेळी किमान तीन आणि जास्तीत जास्त दहा पुरणपोळ्या मागवू शकतात. विशेष म्हणजे, गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी ही पुरणपोळी थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवली जाणार आहे.पुरणपोळीची मागणी https://shgeshop.com या संकेतस्थळावर नोंदवता येणार आहे.
घरपोच सेवा आणि महिला बचत गटांचा सहभाग
ग्राहकांकडून ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांच्या राहत्या ठिकाणाच्या चार किलोमीटरच्या परिसरातील महिला बचत गटाला याची माहिती दिली जाईल. ग्राहकांनी निवडलेल्या वेळेनुसार बचत गटांकडून पुरणपोळी घरपोच केली जाईल. महापालिकेने पुरणपोळी वितरणासाठी एका प्रसिद्ध खाद्य वितरण कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांसाठी एक मोठा ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे.
महापालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले की, “महिला बचत गटांनी तयार केलेली पुरणपोळी थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवली जाणार आहे. यामुळे महिलांना आर्थिक सशक्तीकरण मिळेल आणि मुंबईकरांना घरबसल्या चविष्ट पुरणपोळीचा आनंद लुटता येईल.”