कोल्हापूर : आपली स्वतःची नोकरी सांभाळत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आजकाल काही तरुण करत आहेत. कोल्हापुरातील दोन तरुण देखील मागच्या काही दिवसांपासून याच गोष्टीमुळे प्रसिद्ध झाले आहेत. स्वतः दिवसभर नोकरी करत असून देखील त्यांनी संध्याकाळी स्वतःची एक अनोखी फूड व्हॅन चालू केली आहे. कोल्हापुरात प्रथमच कोरियन फूड ते खवय्यांना खाऊ घालत आहेत. कोरियन कॉर्न डॉग ही डिश सध्या कोल्हापुरातील खाद्यप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळेच याकडे अनेक खवय्ये आकर्षित होत आहेत.
advertisement
श्रेयस पाटील आणि सौरभ चौगुले हे दोघे मित्र एकत्र कोल्हापुरातील एका खाजगी कंपनीमध्ये काम करतात. दोघांचेही इंजिनिअरिंगमधील शिक्षण झाले असून श्रेयस हा कोल्हापुरातील उद्यम नगरमध्ये आणि सौरभ हा कळंबा या ठिकाणी राहतो. कोल्हापुरातील कंपनीत काम करताना मित्र बनलेल्या दोघांनी आपला काहीतरी व्यवसाय असावा, अशी इच्छा बाळगली होती. त्यामुळेच त्यांनी स्वतःची फूड व्हॅन चालवायला सुरुवात केली.
विदर्भातील प्रसिद्ध कणकेचे धोपोडे बनवतात कसे? पाहा सोपी रेसिपी, Video
काय आहे कोरियन कॉर्न डॉग?
स्वतःचा नवीन व्यवसाय करताना नेमकं काय लोकांना आवडेल याचा विचार सगळ्यात महत्त्वाचा असतो. सोशल मीडियावरूनच कोरियन कॉर्न डॉग ही डिश पाहण्यात आली. तेव्हा कोल्हापुरात ही डिश स्ट्रीट फूडच्या माध्यमातून आणण्याचे ठरवले. खरंतर ही पूर्णपणे चीजची रेसिपी आहे. खाताना आतमध्ये विळतलेले चीज आणि बाहेरून कुरकुरीत अशी ही डिश मिळते. बाहेर कुठेच अशी डिश मिळत नसल्याने तरुणवर्गात या डिशची क्रेझ वाढत आहे, असे श्रेयस पाटील याने सांगितले.
कसे बनवले जातात कोरियन कॉर्न डॉग?
कोरियन कॉर्न डॉग हे मुख्यतः चीजचे बनवलेले असतात. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये हे कॉर्न डॉग श्रेयस यांच्याकडे उपलब्ध आहेत.
1) हे कॉर्न डॉग बनवताना यामध्ये चीज हे कट करुन एका स्टिकला लागले जाते.
2) आंबावलेल्या एका पिठात त्या चीज लावलेल्या स्टिक बुडवल्या जातात.
3) पुढे ब्रेडच्या चुऱ्यात या स्टिक घोळवून तळून घेतल्या जातात.
4) तळलेले कॉर्न डॉग हे वेगवगळ्या फ्लेवर नुसार मायोनिज आणि सॉसेस टाकून खायला दिले जातात.
उन्हाळ्यात प्या आरोग्यदायी नाचणीची आंबील, पाहा बनते कशी? Video
बनवून घेतली स्पेशल फूड व्हॅन
श्रेयस आणि सौरभ यांनी स्वतःचा हा व्यवसाय सुरू करताना त्यासाठी स्पेशल फूड व्हॅन बनवून घेतली. लोकांपर्यंत लवकर पोहोचण्यासाठीच त्यांनी ऑफिसच्या समोरची जागा निश्चित केली. जागा कमी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी स्पेशल फूड व्हॅन बनवून घेतली. त्यामध्ये फ्रायरची सोयही बसवून घेतली. ही अशी व्हॅन बनवून घ्यायला त्यांना जवळपास 2 लाखांचा खर्च आला होता, अशी माहिती श्रेयस यांनी दिली आहे.
काय काय मिळतात पदार्थ?
श्रेयस आणि सौरभ यांच्या कोरियन फूड व्हॅनवर कॉर्न डॉग, फ्राइज आणि फ्रूट डेझर्ट असे पदार्थ मिळतात. यामध्ये कॉर्न डॉग हे क्लासिक, पेरी पेरी, मस्टर्ड, तंदुरी मायो या फ्लेवर मध्ये मिळतात. तसेच वेगवेगळी हंगामी फळे मेल्टेड चॉकलेटसह डेझर्ट म्हणून खायला दिली जातात.
उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड फळे खावीत का? आहारतज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
दिवसभर ऑफिसमध्ये काम करून संध्याकाळी श्रेयस आणि सौरभ त्यांची ही फूड व्हॅन चालवतात. त्यामुळे संध्याकाळी फक्त सहा ते दहा या वेळेत त्यांची फूड व्हॅन सुभाष रोडवर गॅलेघर सर्व्हिसेस कंपनीबाहेर उभी असते. दरम्यान याच ठिकाणी अजूनही काही नवनवीन पदार्थ वाढवण्याची कल्पना डोक्यात असल्याचे देखील श्रेयस पाटील यांनी सांगितले आहे.
पत्ता : ब्रदर्स वेगन, गॅलेघर सर्व्हिसेस समोर, सुभाष रोड, कोल्हापूर 416012
संपर्क (श्रेयस पाटील) : 75881 12441