पुरणाचे पोहे वाचूनच विचित्र वाटलं असेल. खरंतर पुरणाच्या पोह्याच्या रेसिपी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत दावा करण्यात आला आहे की ही रेसिपी तुम्हाला कुठेही, कधीही शोधलात तरी सापडणार नाही. इतकी ही युनिक रेसिपी आहे. नावावरूनही तुम्हाला हे कळतंच आहे. व्हिडीओतील महिलेने सांगितल्यानुसार ही तिच्या पणजीची रेसिपी आहे आणि आता तिच्या आजीने तिला सांगितली आहे.
advertisement
आता पुरणाचे पोहे आता कसं काय बनवले असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यामुळे फार वेळ न घालवता आपण आता पुरणाचे पोहे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं, पुरणाचे पोहे कसे बनवतात, ते कसे बनतात हे सगळं सगळं पाहुयात.
पुरणाचे पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य
पातळ पोहे
शेंगदाणे
पोह्यांचा पापड
बारीक शेव
खोवलेलं ओलं खोबरं
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ, साखर
लाल तिखट
लिंबू
उकडलेली चणा डाळ
पुरणाचे पोहे कसे बनवायचे?
पातळ पोहे तेलात तळून घ्यायचे, पोहे तळून झाले की ते एका भांड्यात काढून त्याच तेलात शेंगदाणे तळून घ्यायचे, तेलातून शेंगदाणे काढून त्यात पोह्याचा पापड तळून घ्यायचा.
Matar Recipe Video : मटार पनीर-मटार फ्लॉवर, काय तेच तेच खाणार; ट्राय करा मटारची नवी रेसिपी
आता एका भांड्यात तळलेले पोहे, शेंगदाणे, पोह्याचा पापड कुस्करून टाका. यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, खोवलेलं ओलं खोबरं, बारीक शेव, मीठ, लाल तिखट मसाला, थोडी साखर टाकून सगळं नीट मिक्स करायचं. आता यात हरभरा म्हणजे चण्याची डाळ उकडून यात मिक्स करायची आहे. यामध्ये आपण ही डाळ घालतो म्हणूनच याला पुरणाचे पोहे म्हणतात. वरून लिंबू पिळून पुरणाचे पोहे खायला तयार.
नेहमीचा पोह्यांचा चिवडा, भेळ यापेक्षा थोडी हटके आणि झटपट होणारी असा हा वेगळा पदार्थ. तुम्हीही ही युनिक रेसिपी पुरणाचे पोहे नक्की ट्राय करून पाहा आणि कसे झाले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
