सागर शिंदे, मूळचे साताऱ्याचे, पाच वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात मुंबईत आले होते. परंतु नोकरीत त्यांचे मन रमेना. तेव्हा त्यांनी ठरवलं. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आणि आपल्या गावच्या, म्हणजेच साताऱ्याच्या चवीला मुंबईत नवे रूप द्यायचे. सुरुवातीला काही छोटे-मोठे व्यवसाय करून त्यांनी अनुभव घेतला. त्यानंतर ‘MH 11’ या नावाने मिसळ व्यवसाय सुरू केला. ‘MH 11’ हे साताऱ्याच्या वाहन क्रमांकावरून घेतलेले नाव असून, त्यांच्या व्यवसायाच्या मुळाशी असलेल्या मातीतल्या ओळखीचे प्रतीक आहे.
advertisement
या मिसळीची खासियत म्हणजे त्यात वापरले जाणारे मूळ साताऱ्याचे मसाले, पारंपरिक पद्धतीने बनवलेली रेसिपी आणि सागर शिंदे यांचा प्रेमपूर्वक दिला जाणारा आतिथ्यभाव. मिसळची किंमत फक्त 40 रुपयांपासून सुरू होते, जी आजच्या महागाईच्या काळात खरोखरच कौतुकास्पद आहे. फक्त मिसळच नाही, तर कट वडा, सोलकढी, साबुदाणा खिचडी यांसारखे अनेक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ येथे मिळतात. त्यामुळे प्रत्येक वयाच्या आणि चवीनं पारख असलेल्या ग्राहकांचं समाधान होतं.
गेल्या पाच वर्षांपासून ‘MH 11 मिसळ’ हा व्यवसाय यशस्वीरित्या सुरू आहे. स्थानिक ग्राहकांपासून पर्यटकांपर्यंत सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या ठिकाणाने आता आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सागर शिंदे यांचा हा प्रवास केवळ खाद्य व्यवसायापुरता मर्यादित नाही, तर तो एक प्रेरणादायी आदर्श आहे. "मराठी माणसांनी नोकरीच्या पलीकडे जाऊन व्यवसायात उतरावं" या त्यांच्या विचाराला त्यांनी कृतीतून सिद्ध केलं आहे.
ठिकाण:
MH 11 मिसळ स्पेशल,
विद्याभूषण शाळेजवळ, अशोकवण, दहिसर (पूर्व), मुंबई
वेळ: सकाळी 8 ते संध्याकाळी 8