हजारीबाग : दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. भारतीय आहारात दह्याला विशेष महत्त्व आहे. प्रामुख्यानं लोक उन्हाळ्यात दही भरपूर प्रमाणात खातात. आहारतज्ज्ञ रोजच्या आहारात दह्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात. परंतु दही दिवसभरात कधीही खाऊ नये, तर ते खाण्याचे काही नियम आहेत, नाहीतर आरोग्य बिघडू शकतं.
डॉ. मकरंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, ज्यामुळे अन्नपचन सुरळीत होतं. तसंच दह्यामुळे केवळ वजन कमी होण्यास मदत मिळत नाही, तर त्वचा आणि केसही चमकदार होतात. त्याचबरोबर शरीरातील विषाणू नष्ट करण्यासही दही फायदेशीर ठरतं. परंतु सांधेदुखी असेल तर दही अजिबात खाऊ नये. तसंच गॅस, अॅसिडिटीमध्येही दही कमी प्रमाणात खावं.
advertisement
देशी गायीच्या दुधापासून बनवलेलं दही सर्वाधिक फायदेशीर असतं. परंतु ते जास्त दिवसाचं नाहीये ना, भरपूर आंबट नाहीये ना, याची खात्री करून घ्यावी. नाहीतर ते दही आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं.
डॉक्टरांनी सांगितलं की, सकाळी आणि दुपारी दही खाणं आरोग्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. परंतु सूर्य मावळल्यानंतर दही खाणं टाळावं. तसंच उडदाची डाळ, मसूर डाळ, मासे, आंबट फळं आणि भाज्यांसोबत दही कधीच खाऊ नये. जर दही योग्य प्रकारे आणि योग्य वेळी खाल्लं, तरच ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
डॉक्टरांनी पुढे असंही सांगितलं की, दह्याच्या तुलनेत ताक अधिक फायदेशीर असतं, विशेषतः उन्हाळ्यात. ताकामुळे शरीराला जास्त गारवा मिळतो. परंतु ताक केवळ दिवसा प्यावं. रात्री प्यायल्यानं कफ होऊ शकतो.