या लेमन टी चा पाया तुकाराम महाडिक यांनी रचला. त्याकाळी एफसी रोड परिसरात विविध पेयांची दुकाने होती, मात्र काहीतरी वेगळे आणि हलके पेय मिळावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून आणि ग्राहकांकडून वारंवार होत होती. हीच गरज लक्षात घेऊन त्यांनी लेमन टीची सुरुवात केली. सुरुवातीला एका कप लेमन टीची किंमत अवघी पाच रुपये होती. विद्यार्थ्यांसाठी ही किंमत सहज परवडणारी असल्याने लवकरच त्याला लोकप्रियता मिळाली.
advertisement
आज याची किंमत पंधरा रुपये झाली आहे, तरीही जुन्या ग्राहकांची ओढ अजूनही तशीच आहे. अनेक पुणेकर आजही म्हणतात की, एफसी रोडवर गेलो आणि हिराबाई महाडिकांचा लेमन टी घेतला नाही, तर भेट अपुरीच राहते. या ठिकाणाचा सुगंध, चव आणि वातावरण ग्राहकांना विशेष अनुभव देते.
सुरेश धानवले सांगतात की, लेमन टीचा हा प्रवास फक्त व्यवसायापुरता नाही, तर पुण्याच्या खाद्यपरंपरेचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. दररोज शेकडो ग्राहक या ठिकाणी येतात. अनेक तरुणाई, ज्येष्ठ नागरिक, तसेच परदेशी पर्यटकही येथे चहा घेण्यासाठी थांबतात. लेमन टीची चव जरी साधी असली तरी त्यातली सातत्याची परंपरा ही खरी ताकद आहे.
अनेक दशके उलटून गेली तरी रेसिपीमध्ये फारसा बदल केलेला नाही. त्याच ताजेपणाने आणि साधेपणाने बनवला जाणारा हा लेमन टी आजही अनेकांचा आवडता आहे.
एफसी रोडवरून जाणारे अनेक पुणेकर अजूनही खास वेळ काढून येथे येतात. गर्दीच्या शहरजीवनात थोडासा दिलासा देणारा हा कप लेमन टी म्हणजे पुणेकरांच्या आठवणींचा आणि सवयींचा भाग झाला आहे. त्यामुळेच हिराबाई महाडिक लेमन टी हे नाव पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत आजही कायम आहे.