जाणून घेऊयात त्या प्रभावी घरगुती उपायांबद्दल जी हिवाळ्यात सर्दी- खोकल्याच्या त्रासावर गुणकारी ठरू शकतात.
मध: मधात असलेल्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे खोकल्यापासून आराम मिळतो. कोमट पाण्यात किंवा आल्याच्या चहामध्ये 1 चमचा मध मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा प्यायल्याने घशाला आराम मिळतो. याशिवाय गरम पाण्यात मध टाकून प्यायल्याने कफ वितळून छाती मोकळी व्हायला मदत होते.
advertisement
आलं: मधाप्रमाणे आल्यातही अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे विषाणूंचा त्रास कमी होऊन घशाची जळजळ कमी होते आणि खोकला बरा होण्यास मदत होते. तुम्ही कच्च्या आल्याचे तुकडे चावून खाऊ शकता. चहा किंवा मधाच्या पाण्यात आल्याचा तुकडा टाकून ते प्यायल्याने घशाला आराम मिळतो.
ज्येष्ठमध: खोकला किंवा घसा खवखवण्याच्या त्रासावर ज्येष्ठमध हे गुणकारी आहे. ज्येष्ठमध खाल्ल्याने कफ वितळून खोकला कमी व्हायला मदत होते. मध आणि ज्येष्ठमधाची पावडर एकत्र करून दिवसातून 2 वेळा खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.
मध आणि लवंग: हिवाळ्यात तुम्हाला सर्दी किंवा खोकला किंवा दोन्हींचा त्रास होत असेल तर लवंग आणि मधाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. लवंग बारीक करून मधात मिसळून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा लवंग मधाचं सेवन करू शकता. याशिवाय खोकल्याची उबळ रोखण्यासाठी तुम्ही लवंग जीभेखाली ठेऊ शकता.
दूध आणि हळद: हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा सक्रिय घटक असतो ज्यामुळे हळदीची ही नैसर्गिंक अँटिबायोटिक ठरते. खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दुधात एक चमचा हळद टाकून ते दूध पिऊ शकता. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून तुमच्या शरीरातलं संक्रमण कमी होईल.
कोमट पाण्याच्या गुळण्या: सर्दी खोकल्यासोबतच तुमचा घसा खवखवत असेल, घसा बसला असेल किंवा गिळायला त्रास होत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणं फायदेशीर आहे. जर तुमच्या घरी बिटाडिन असेल तर तुम्ही कोमट पाण्यात 1 झाकण बेटाडिन टाकून तुम्ही गुळण्या करू शकता. यामुळे तुम्हाला अवघ्या काही वेळातच फरक जाणवेल.
वाफ घेणं : गरम पाण्याच्या गुळण्यांप्रमाणेच वाफ घेतल्याने सर्दी -खोकल्याचा त्रास कमी व्हायला मदत होते. वाफ घेतल्याने छातीला कफ वितळून श्वास घेण्यातली अडचण दूर होते. निलगिरीचं तेल गरम पाण्याची वाफ घेतल्याने अधिक फायदा होऊ शकतो.