मुंबई : सध्याच्या लाईफस्टाईलमुळे महिलांचा दिनक्रम इतका व्यस्त झाला आहे की, त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक समस्या देखील वाढू लागल्या आहेत. त्यातील एक समस्या म्हणजे PCOD. देशात सुमारे 10 ते 20 टक्के महिला या पीसीओडीच्या समस्येने त्रस्त आहेत. तर बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात दुखणे, अंग दुखणे अशा प्रकारचे अनेक त्रास होतात. याच PCOD आणि मासिक पाळीच्या वेदनेवर योगा हे एक उत्तम औषध आहे. मुंबईतील योग शिक्षक संदेश कर्नाळे यांनी यासाठी खास योगासने सांगितली आहेत.
advertisement
PCOD म्हणजे काय?
PCOD मध्ये महिलांची पाळी वेळेवर न येणे, वजन वाढणे, केस गळणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. PCOD म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर होय. यामध्ये स्त्रीच्या शरीरातील दोन मुख्य हार्मोन्स - इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचे संतुलन बिघडते. इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढल्यामुळे अंडाशयात सिस्ट तयार होतात आणि मासिक पाळी अनियमित होते.
कराटे खेळासाठी आयुष्य समर्पित केलेला तरूण; गरीब मुलांना देतोय स्वसंरक्षणाचे धडे Video
योगा शिक्षक संदेश कर्नाळे यांनी PCOD आणि मासिक पाळी दरम्यान पोटात क्रॅम्प येतात त्यातून आराम मिळण्यासाठी काही योगासने सांगितली आहेत. संदेश चार वर्षांपासून योगा क्लासेस घेत आहेत. ते एक सर्टिफाइड योगा शिक्षक आहेत. संदेश यांनी बटरफ्लाय आसन, उष्ट्रासन (कॅमल पोज), भुजंगासन, धनुरासन (Bow Pose), सेतुबंधासन (Bridge Pose) ही पाच आसने सांगितली आहेत.
ही पाच योगासने कशी करावी?
1) बटरफ्लाय आसन (Butterfly Pose)- फुलपाखरू आसन करण्यासाठी योग मॅटवर बसून आपले दोन्ही पाय पुढे पसरवून गुडघ्यात वाकवा. ज्यामुळे दोन्ही पायांचे तळवे एकमेकांशी जोडले जातील. आता दोन्ही हातांनी पायांचे तळवे घट्ट पकडून पाय वरखाली हलवा. सुरुवातीला एक-दोन मिनिटे हे आसन करा, नंतर हळूहळू आपल्या क्षमतेनुसार त्याचा वेळ वाढवा. जमल्यास 20 चे दोन सेट करायचे आहेत, असं कर्नाळे यांनी सांगितलं आहे.
२) उष्ट्रासन (Camel Pose) - योगा मॅटवर आधी दंडासनमध्ये बसायचं. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. त्यानंतर उजवा पाय मागे दुमडायचा नंतर डावा पाय मागे दुमडायचा आणि मग हळूहळू गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. पायाच्या तळव्यांचा वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरच्या दिशेला असणे आवश्यक आहे. श्वास घेत उजवा हात मागे नेत उजव्या पायाच्या टाचेला हात लावायचा. नंतर डावा हात मागे नेत डाव्या पायाच्या टाचेला लावायचा. मानेचा भाग मोकळा सोडा. मानेवर ताण पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या आसनामध्ये 20 सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर श्वास सोडत आसनाच्या मुद्रेतून बाहेर या. पाठ-हात हळूवारपणे पुढे आणत वज्रासनमध्ये बसायचं आहे.
Health Tips : तुमची मुलं जेवतानाही मोबाईल पाहतात का? ही सवय मोडण्याचा सोप्पा उपाय
3) भुजंगासन (Cobra Pose)- हळूवारपणे जास्त ताण न देता पोटावर झोपायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात सुरुवातीला छातीच्या बाजूला समांतर रेषेत हवेत. श्वास घेत हळूवारपणे डोके, छाती व पोट वर उचला, पण तुमची नाभी जमिनीवरच असू द्या. हातांचा आधार घेत शरीर जमिनीपासून उचलून मागे टाचेकडे खेचायचं आहे. मात्र दोन्ही तळहातांवर सारखेच वजन असू द्यावं. या आसनात 20 सेकंदापर्यंत स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. 20 सेकंदानंतर श्वास सोडत आपले पोट, छाती व डोके जमिनीवर टेकवत पूर्वस्थितीत यायचं आहे.
4) धनुरासन (Bow Pose)- योगा मॅटवर हळूवारपणे जास्त ताण न देता पोटावर झोपायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात सुरुवातीला छातीच्या बाजूला समांतर रेषेत हवेत. त्यानंतर हळूवारपणे उजवा पाय गुडघ्यातून डोक्याच्या दिशेनं वाकवा नंतर डावा पायही डोक्याच्या दिशेनं गुडघ्यात वाकवा. हातांनी दोन्ही पायांच्या घोट्यांना धरा. छाती आणि मांड्या जमिनीवरून उचलून हातांनी पाय ओढा. शरीराची स्थिती धनुष्यासारखी ताणला गेली पाहिजे. या आसनात हात धनुष्याच्या ताराप्रमाणे दिसतात. आसनात 20 सेकंदापर्यंत स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर पुन्हा तुमच्या सामान्य स्थितीमध्ये यायचं आहे.
Makar Sankranti : दरवर्षी मकर संक्रांती एकाच तारखेला का? कॅलेंडरच आहे खरं कारण
5) सेतुबंधासन (Bridge Pose)- योगा मॅटवर पाठीवर सरळ झोपायचं आहे. शरीर एका रेषेत असावं. आता हळुवारपणे सुरुवातीला उजवा पाय गुडघ्यातून दुमडून घ्यायचा आहे. मग डावा पाय गुडघ्यातून दुमडून घ्यायचा आहे. दोन्ही हात शरीरालगत असावेत. आता हळुवारपणे जमिनीपासून पोटाला वर उचलायचं आहे. या आसनात 20 सेकंदापर्यंत स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर हळुवारपणे पोटाला खाली आणून पूर्वस्थितीत यायचं आहे.
योगा शिक्षक संदेश कर्नाळे यांनी अगदी सोप्या पद्धतीनं 5 योगासनांबाबत माहिती सांगितली आहे. तसेच ही सर्व योगासने नियमितपणे करणे आवश्यक असल्याचंही कर्नाळे यांनी म्हटलंय. 2 ते 3 महिने नियमित ही योगासने केल्यानं नक्कीच फरक पडेल, असंही कर्नाळे सांगतात.
PCOD आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम हवा असेल तर नक्कीच ही योगासने करायला हवीत आणि तेही अगदी नियमितपणे. मात्र PCODची समस्या जर जास्तच वाढत असेल तर योगा, वर्कआऊट याचसोबत डॉक्टरांचा सल्ला घेणंही तितकच महत्त्वाचं आहे. तसेच सर्वांनीच रोज स्वत:च्या शरीरासाठी अर्धातास वेळ काढला तरी आपल्या अनेक व्याधी योगासनांच्या माध्यमातून नक्कीच दूर होऊ शकतात.