कोल्हापूर : साठीत जडणारं मधुमेहाचं दुखणं अर्थात डायबिटीज आता तरुणांमध्ये सर्रास आढळतं. शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांनाही या आजाराचा धोका असतो. यावर सर्वोत्तम उपाय आहे, सकस आहार आणि गोड खाण्यावर नियंत्रण.
आपण नियमित गोड पदार्थ खात असाल, तर त्याचे शरिरावर अनेक नकारात्मक, गंभीर परिणाम होतात. अनेकजणांना गोड खाणं बंद करायचं असतं, परंतु साखर खाण्याच्या सवयीमुळे त्यांच्याकडून ते शक्य होत नाही. जर गोड पदार्थ खाल्ले नाहीत, तर अशक्तपणा येतो, थकल्यासारखं वाटतं. मग प्रश्न पडतो, साखर खाणं नक्की चांगलं की वाईट? त्यामुळे आज आपण जाणून घेऊया साखर न खाल्ल्यास नक्की काय होतं, याबाबत कोल्हापुरातील सेलिब्रेटी फिटनेस कोच सागर गाताडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
हेही वाचा : पावसाळ्यात आजार ठेवायचे असतील दूर, तर घ्या 'हा' 1 कप चहा! Immunity वाढेल
सागर सांगतात, साखर चवीला कितीही स्वादिष्ट असली, पदार्थांची चव वाढवत असली. तरी साखर म्हणजे पांढरं विष आहे. साखरेच्या अतिसेवनामुळे शरिरावर अनेक दुष्परिणाम होतात.
नक्की काय होतं नुकसान?
साखर शरिराला आतून पोखरते. साखरेच्या अतिसेवनामुळेच डायबिटीजचा धोका वाढतो. शिवाय शरिरातील अनेक यंत्रणांवर याचा प्रभाव पडतो. यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते, रक्तदाब वाढू शकतो, हृदयावरील दाब वाढू शकतो, शरिरातील नसांवर प्रभाव पडू शकतो, त्वचा कोरडी पडू शकते, त्वचेवर डार्क पॅच पडू शकतात. हे सगळे दुष्परिणाम साखरेच्या अतिसेवनामुळे होऊ शकतात. त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी करणं किंवा साखर आहारातून पूर्णपणे वगळणं ही आता काळाची गरज झाली आहे, असं सागर सांगतात.
हेही वाचा : चपाती आणि भात कधीच खाऊ नये एकत्र, मोठं दुखणं होऊ शकतं! तज्ज्ञ सांगतात...
साखर बंद केल्यानं काय होतं?
सुरूवातीला फक्त 10 दिवस साखर खाणं बंद करावं. त्याचेही भरपूर फायदे आपल्याला जाणवू शकतात. वजन कमी होण्यास मदत मिळते, इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते, त्वचेचा पोत सुधारतो, शरीर ऊर्जावान राहतं, मेंदूच्या पेशींचं संरक्षण होऊन त्याची कार्यक्षमता सुधारते, स्वादूपिंडावरील ताण कमी होऊन त्याचीही कार्यक्षमता चांगली होते, अशी माहिती सागर गाताडे यांनी दिली.
दरम्यान, गोड पदार्थ कितीही आवडत असले, तरी साखर आणि साखर वापरून बनवलेले पदार्थ कमी प्रमाणातच खायला हवे. साखरेचं अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे साखर खाणं बंद करणं कधीही योग्य, असं सागर यांनी स्पष्ट केलं.
सूचना : ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.