हिवाळ्यात ओठ फाटण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे नैसर्गिक ओलावा कमी होणं. तापमान घटतं, हवा कोरडी होते आणि शरीरातील आर्द्रता कमी होत जाते. अशा वेळी अनेक जण वारंवार ओठांवर जीभ फिरवतात पण ही सवय ओठांना आणखी जास्त कोरडे करते. त्यामुळे पहिली ही सवय ताबडतोब थांबवणं. ओठांची त्वचा अत्यंत पातळ आणि संवेदनशील असते.
advertisement
त्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळा नॅचरल मॉइश्चरायझर असलेलं लिप बाम लावणं अत्यंत गरजेचं. शिया बटर, मध, व्हिटॅमिन ई, अलोवेरा किंवा ग्लिसरीन असलेलं लिप बाम ओठांना खोलवर ओलावा देतं आणि क्रॅक्स भरून काढण्यास मदत करतं. घराबाहेर जाताना मात्र एसपीएफ असलेलं लिप बाम वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हिवाळ्यात सूर्यकिरण जरी सौम्य वाटत असले तरी ते ओठांना नुकसान पोहोचवू शकतात.
आता पाहूया घरगुती उपाय, जे हिवाळ्यात खूपच प्रभावी ठरतात
रात्री झोपण्यापूर्वी नारळाचं किंवा बदामाचं तेल ओठांवर लावल्याने संपूर्ण रात्र ओठ मऊ आणि हायड्रेटेड राहतात. आठवड्यातून एकदा मध आणि साखरेचा हलका स्क्रब केल्यास मृत त्वचा निघून जाते आणि ओठांचा नैसर्गिक गुलाबीपणा वाढतो. याशिवाय, काकडीचा रस, गुलाबपाणी आणि मधाचं मिश्रण, किंवा अलोवेरा जेल हेही ओठांना शांतता देणारे आणि कोरडेपणा कमी करणारे चांगले नैसर्गिक पर्याय आहेत. घरातच सहज करता येणारा आणखी एक उपाय म्हणजे तूप. हलकंसे गरम करून ओठांवर लावल्यास ते ओलावा टिकवून ठेवतं आणि क्रॅक्स भरायला मदत करतं. काही जण दुधाची साय देखील वापरतात, सायतील नैसर्गिक फॅट्स ओठांना मऊ करण्यासाठी उत्तम.
शरीरातील पाण्याची कमतरता ओठ पटकन कोरडे करते. त्यामुळे दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं. व्हिटॅमिन बी, सी आणि ई असलेले पदार्थ जसे की संत्री, डाळिंब, ड्रायफ्रूट्स, बिया, आणि हिरव्या पालेभाज्या ओठांचा नैसर्गिक मऊपणा टिकवतात.
हिवाळ्यात अनेक जण गरम पाण्याने आंघोळ करतात. पण गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेलं कमी करतं आणि याचा परिणाम ओठांवरही दिसतो. त्यामुळे खूपच गरम पाण्याचा वापर टाळावा किंवा आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर आणि लिप बाम लावावा.
शेवटी एक महत्त्वाची टीप
ओठ चावण्याची किंवा त्यावरील सुकलेली त्वचा ओढून काढण्याची सवय टाळा. यामुळे जखम होऊ शकते आणि ओठ आणखी खराब होतात. हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीला ओठ सगळ्यात आधी तोंड देतात. पण योग्य काळजी, घरगुती उपाय आणि थोडी नियमितता यांच्या मदतीने आपण ओठांना फक्त संरक्षणच नाही तर मऊ, गुलाबी आणि आरोग्यदायी ठेवू शकतो.





