कोडरमा : आजकाल गरोदर न राहण्याच्या गोळ्या बाजारात सर्रास मिळतात. अनेक महिला केवळ इंटरनेटवर माहिती मिळवून अशा गोळ्या घेतात. अगदी तरुणींमध्येही हे प्रमाण मोठं आहे. मात्र याचे आरोग्यावर खूप दुष्परिणाम होऊ शकतात, असं डॉक्टर सांगतात.
कोणतंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यावं. कारण त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहित नसतात आणि गर्भधारणेबाबतच्या गोळ्यांचा संबंध हा थेट हॉर्मोन्सशी असतो. जर या गोळ्यांमुळे हॉर्मोन्स असंतुलित झाले तर त्वचेसंबंधित, केसांसंबंधित, वजनासंबंधित विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
डॉ. अलंकृता मंडल सिन्हा यांनी सांगितलं की, काही महिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेतात. या गोळ्यांमुळे इंटरनल ब्लीडिंग होण्याची शक्यता असते. डॉक्टरांकडून अशा गोळ्या हिमोग्लोबिन टेस्ट आणि सोनोग्राफी केल्याशिवाय दिल्या जात नाहीत. तसंच गरोदरपणाचं निदान झाल्यानंतर 7 ते 9 आठवड्यांमध्येच अशी गोळी दिली जाते. डॉक्टर महिलेच्या जीवाला कोणताही धोका पोहोचणार नाही याची पूर्ण काळजी घेऊनच गर्भपात करतात. परंतु कोणत्याही मेडिकलमध्ये जाऊन स्वतः गर्भपाताची गोळी घेणं अत्यंत धोक्याचं आहे.
सल्ल्याशिवाय गर्भपाताची गोळी घेतल्यास कधीकधी 10 दिवस, तर कधीकधी अगदी 2 महिन्यापर्यंत ब्लीडिंग होऊ शकतं. अशात महिलेचा हिमोग्लोबीन स्तर खूप कमी होतो, याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, महिलेचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर गर्भपातानंतर तिला अँटी डी इंजेक्शन दिलं जातं, जेणेकरून भविष्यात गर्भधारणेत काही अडचणी येऊ नये, शिवाय बाळाला कावीळ असेल तर त्यापासून त्याचं रक्षण होऊ शकतं. म्हणूनच सल्ल्याशिवाय कधीच अशा गोळ्या घेऊ नये.