जाणून घेऊयात मखनाच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल.
पॉपकॉर्नसारखा किंवा सोप्या भाषेत लाह्यांसारखा दिसणारा एक पदार्थ म्हणजे मखना. मात्र मखन्यात पॉपकॉर्नपेक्षा जास्त पोषकतत्त्वं असतात. मखन्यात विविध जीवनसत्त्वं, खनिजं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, अमीनो ॲसिड, फायबर्स, अँटिऑक्सिडंट्स आणि फॉस्फरस देखील भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे मखना खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड फायद्याचं ठरू शकतं. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मखना हे सर्वोत्तम असल्याचा दावा अनेक आहारतज्ज्ञ करतात.
advertisement
पीएसआरआय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ पूनम दुनेजा यांनी न्यूज18 ला सांगितलं की, मखन्यात प्रोटिन्स्, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई तसेच आढळून येतात. जे शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.
1) हृदयविकारांवर गुणकारी : मखन्यात असलेल्या पोटॅशियम, मॅग्नेशियममुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. मखान्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण कमी असतं, यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारून हृदयविकारांचा धोका कमी व्हायला मदत होते.
2) डायबिटीसच्या रूग्णांसाठी गुणकारी : मखन्यामध्ये चांगल्या प्रमाणात विरघळणारं फायबर असतं, ज्यामुळे रक्तातली साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. यामुळे शरीरात इन्सुलिनच्या स्रावाचं प्रमाण सुधारतं. ज्यामुळे डायबिटीसचा धोका कमी होऊ शकतो.
3) हाडांच्या मजबुतीसाठी फायद्याचं : मखन्यात असलेल्या कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरसमुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडांची घनता वाढायला मदत होते. सांधेदुखी, ऑस्टियोपोरोसिस गंभीर आजारांना यामुळे प्रतिबंधित करता येऊ शकतो.
4) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर: मखन्यामध्ये कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला तुमचा वजन कमी करून फिटनेस सुधारायचा असेल आणि असेल तर मखान्याचं नियमितसेवन हे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.
5) रोगप्रतिकारक शक्ती वाढते : मखन्यात असलेल्या व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून हंगामी आजारांपासून रक्षण होऊ शकतं. याशिवाय व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स हे त्वचेच्या आरोग्यासाठी सुध्दा फायद्याचे ठरतात. यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळून त्वचा हायड्रेट राहायला मदत होते. त्यामुळे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं. नियमितपणे मखाना खाल्ल्याने त्वचा सुधारते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
हे सुद्धा वाचा : कॅल्शियम युक्त आहे मखाना; त्याचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित