अभ्यंग म्हणजे नेमकं काय?
आयुर्वेदानुसार शरीराला औषधी तेलाने केलेली मालिश म्हणजेच अभ्यंग होय. डोक्यापासून पायापर्यंत विशिष्ट पद्धतीने तेल लावून मालिश केली जाते. अभ्यंग हे केवळ मालिश नसून ती शरीर, मन आणि इंद्रियांना पोषण देणारी एक उपचारपद्धती मानली जाते.
ओल्या तुरीच्या दाण्यांची विदर्भ स्टाईल झुणका, हिवाळ्यात बनवा झणझणीत रेसिपी !
advertisement
हिवाळ्यात अभ्यंग का करावा?
हिवाळ्यात थंडी आणि वातावरणात कोरडेपणा वाढतो. त्यामुळे शरीरातील वातदोष वाढतो. वातदोष वाढल्यामुळे सांधेदुखी, अंगदुखी, त्वचेचा कोरडेपणा, थकवा, चिडचिड अशा समस्या उद्भवतात. अभ्यंगामुळे शरीरात उष्णता टिकून राहते आणि वातदोष नियंत्रणात राहतो. म्हणूनच आयुर्वेदात हिवाळ्यात अभ्यंगाला विशेष महत्त्व दिलं आहे.
अभ्यंगाचे आरोग्यदायी फायदे
1. अभ्यंग त्वचेसाठी लाभदायक आहे. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. मऊ आणि तेजस्वी राहते.
2. तसेच अभ्यंग सांधेदुखीवर देखील उपयोगी आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी कमी होण्यास मदत होते.
3. अभ्यंगामुळे रक्ताभिसरण सुधारते. शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो. थकवा आणि तणाव कमी होतो. मन शांत होऊन मानसिक ताण कमी होतो.
4. त्याचबरोबर झोप देखील सुधारते. अभ्यंगामुळे झोप गाढ लागते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हिवाळ्यात अभ्यंगासाठी कोणते तेल वापरावे?
1. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिळाचे तेल. कारण तिळाचे तेल हिवाळ्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.
2. दुसरे म्हणजे नारळ तेल. त्वचा अती जास्त कोरडी असल्यास खोबरेल तेल म्हणजेच नारळ तेल वापरू शकता.
3. त्यानंतर बदाम तेल देखील तुम्ही वापरू शकता. बदाम तेल हे पौष्टिक आणि उष्णता देणारं असल्याने हिवाळ्यात त्वचेसाठी उत्तम मानले जाते.
सकाळी आंघोळीपूर्वी कोमट तेल लावून घ्यावे. डोक्यापासून पायापर्यंत हलक्या हाताने मालिश करावी. किमान 15 ते 30 मिनिटे तेल अंगावर ठेवावे. नंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी. त्वचारोग किंवा इतर काही समस्या असल्यास अभ्यंग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.





