अमरावती : प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूचे वातावरण हे त्याच्या वागणुकीला कारणीभूत असते. त्यामुळे काही वेळा अनेक लोकं व्यसनाच्या आहारी जातात. अनेकांना मद्यपान करण्याचे व्यसन असते. त्यामुळे आरोग्य सुद्धा धोक्यात येताना आपण बघतो. मद्यपान केल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. मद्यपान केल्याने लगेच काहीही होत नसल्याने शरीरावर होणारा दुष्परिणाम लगेच लक्षात येत नाही. ही हळूहळू होणारी प्रक्रिया असल्याने आजार जास्त झाल्यानंतर लक्षात येते. मद्यपान केल्याने कोणकोणत्या आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते? याबाबतची माहिती डॉ. चैतन्य वाघमारे यांनी दिली आहे.
advertisement
मद्यपान केल्याने कोणकोणत्या आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता?
सद्यस्थितीमध्ये 18 ते 25 या वयोगटातील तरुण जास्तीत जास्त व्यसनाच्या आहारी गेलेले दिसून येतात. मद्यपान, धूम्रपान या सारख्या सवयी तरुणांचे आयुष्य उध्वस्त करत आहेत. जास्त प्रमाणात अल्कोहोल हे मानवी शरीराला घातक आहे. त्यामुळे मधुमेह, ब्लडप्रेशर, किडनीचे विविध आजार, लिव्हरचे विविध आजार होतात.
अनेक वेळा अती मद्यपान हे मानवी शरीराला निकामी करून ठेवते. तरुण वर्गात सद्यस्थितीमध्ये मधुमेह, ब्लडप्रेशर, लिव्हरवर सुज येणे या सारख्या समस्या निर्माण होताना दिसून येत आहे. त्यामुळे तरुण वर्गाने काळजी घेणे गरजेचे आहे, असं डॉ. चैतन्य वाघमारे सांगतात.
काही वेळा मद्यपान हानिकारक आहे हे आपल्या लक्षात असते, आपल्याला ते समजायला सुद्धा येते. मात्र, सवय झाल्यामुळे मद्यपान बंद होत नाही. अशावेळी तुम्ही मानसिक रोग तज्ज्ञांनी दाखवून मद्यपान कमी करण्यास मदत घेऊ शकता. त्यावर योग्य उपचार घेतल्यास मद्यपान या सवयी असून सुटका मिळू शकते. आरोग्यासाठी मानसिक रोग तज्ज्ञांनी दाखविणे चुकीचे नाही.
मानवी शरीराला मद्य हे घातकच असतं. दिवसाला फक्त 15 ते 30 मिली इतकचं मद्य मानवी शरीर पचवू शकतं. यावर मद्यपान केल्यास मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. मानवी शरीराचे संतुलन बिघडते, असेही डॉ. चैतन्य वाघमारे यांनी सांगितले.
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.