बाळाचा खोकला थांबेना, डॉक्टरांना शंका आली, दुर्बिणीतून पाहिलं अन्..., सगळ्यांनाच धक्का!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: कुटुंबीयांनी सुरुवातीला अनेक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले; मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
छत्रपती संभाजीनगर : घरात खेळताना किंवा आई-वडिलांचे लक्ष दुसरीकडे असताना लहान मुले अनेकदा तोंडात वस्तू घालतात. अशाच एका घटनेमुळे अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्याचा श्वास गुदमरू लागला आणि तब्बल सात दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली. अखेर घाटी रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाने केलेल्या तातडीच्या शस्त्रक्रियेमुळे बालकाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
आईचे लक्ष नसताना एक वर्षाच्या भरतने चुकून बदामाचा तुकडा गिळला. त्यानंतर त्याला सतत खोकला, ताप आणि दम लागण्याचा त्रास सुरू झाला. कुटुंबीयांनी सुरुवातीला अनेक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले; मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर बालकाला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घाटीतील बालरोग विभागातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बालकाला कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे पुढील तपासणीसाठी पाठवले. तपासणीत फुफ्फुसात एखादी परकी वस्तू अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर करण्यात आलेल्या सीटी स्कॅन तपासणीत बालकाच्या डाव्या फुफ्फुसात बदामाचा तुकडा अडकलेला असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. कान-नाक-घसा विभागातील डॉ. सोनाली जटाळे, डॉ. गिरिजा, डॉ. कल्याणी, डॉ. उत्कर्ष आणि डॉ. ऋषिकेश यांनी शस्त्रक्रियेत मोलाचे योगदान दिले. तसेच भूलतज्ज्ञ डॉ. गणेश निकम व डॉ. आमेर, निवासी डॉक्टर, ओटी परिचारिका आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेत विशेष सहकार्य केले.
advertisement
बालकाची अवस्था गंभीर असल्याने पहाटे दीड ते दोनच्या दरम्यान तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दुर्बिणीद्वारे (ब्रोन्कोस्कोपी) विशेष चिमट्याच्या सहाय्याने फुफ्फुसात अडकलेला बदामाचा तुकडा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे बालकाचा जीव वाचला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, लहान मुलांना कडक, न चिरलेले किंवा पूर्ण न दळलेले पदार्थ देताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी पालकांना केले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 1:12 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
बाळाचा खोकला थांबेना, डॉक्टरांना शंका आली, दुर्बिणीतून पाहिलं अन्..., सगळ्यांनाच धक्का!









