मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आपला आहार एकदम सकस आणि पौष्टिक ठेवावा. टाईप 1 डायबिटीस असणाऱ्यांनी आहारात भाजीपाला, फळे यांचा समावेश असावा. विशेष म्हणजे प्रथिने आणि कर्बोदके यांचा संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. पालेभाज्या, फळभाज्या, सलाड, कडधान्य हे सर्व आहारात घ्यावे. तसेच दररोज जेवणामध्ये वरण-भात, पोळी-भाजी, एखादी पालेभाजी, कोशिंबीर हे सुद्धा असणं गरजेचे आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
World Diabetes Day: तुमच्या मुलांत ही लक्षणे तर नाहीत ना? मधुमेहाचा धोका वाढतोय, लगेच घ्या काळजी!
ज्यांना टाईप टू डायबेटिस आहे अशांनी त्यांचा देखील आहार संतुलित ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्या उंचीप्रमाणे, त्यांच्या वजनाप्रमाणे आहार व्यवस्थापन करावे. ज्यांना टाईप टू डायबिटीज आहे त्यांनी त्यांच्या गोळ्या औषधांप्रमाणे आहार व्यवस्थापन करावं. प्रथिनयुक्त डाळी, कडधान्ये, तसेच जे नॉनव्हेज खातात त्यांनी अंडी व्यवस्थित प्रमाणामध्ये घ्यावी. आठवड्यामध्ये एक ते दोन वेळा मांसाहार केला तरी चालतो. तसेच कारलं, गवार, मेथी आणि इतर पालेभाज्या आहारात असाव्यात. तंतुमय पदार्थांचा देखील आहारात समावेश करावा.
मधुमेहाच्या रुग्णांनी हे खाऊ नये
मधुमेहाच्या रुग्णांनी ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त आहे अशा फळांचा समावेश आहारात करू नये. केळी, सीताफळ, द्राक्षे, चिकू ही फळे खाऊ नयेत. तर संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब ही फळे खावीत. पण एका वेळी फक्त शंभर ग्रॅम एवढे खावे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
साखरेऐवजी गूळ खावा का?
काही वेळा आपला समज असतो की, आपल्याला शुगर असल्याने आपण साखर खाऊ शकत नाही. तर गूळ आणि मध खाऊ शकतो. पण तसं नाही. साखरेप्रमाणेच मधुमेहींना गूळ आणि मधाचं सेवन देखील घातक ठरू शकतं. तरीही तुमची गोड खाण्याची इच्छा झालीच तर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तुम्ही शुगर फ्री असलेले पदार्थ खाऊ शकता, असेही आहारतज्ज्ञ सांगतात.





