आग्रा : मार्च महिन्यात सुरू झालेला उष्णतेचा कहर अद्याप सुरूच आहे. सध्या अक्षरश: जीवघेणं ऊन पडतं. संध्याकाळ झाली तरी पंख्याशिवाय अंगाची लाहीलाही होते. विचार करा, आपण शरीर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करू शकतो. परंतु प्राण्यांचे काय हाल होत असतील, ते तर कोणाला सांगूही शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तितकं प्राण्यांचं उन्हापासून रक्षण करा.
advertisement
आग्र्यातील डॉग अँड पेट्स केयर हॉस्पिटलचे डॉक्टर संजीव नेहरू यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात जेवढा त्रास आपल्याला होतो तेवढाच प्राण्यांनाही होतो. विशेषत: कुत्र्यांचं शरीर उन्हानं पार भाजून निघतं. कारण त्यांच्या शरिराचं तापमान अगोदरच आपल्या शरिराच्या तापमानापेक्षा जास्त असतं. तसंच आपल्या शरिरातील उष्णता घामावाटे बाहेर पडू शकते. परंतु कुत्र्यांच्या शरिरावर स्वेट ग्लँड्स असल्यामुळे त्यांना घाम येत नाही. म्हणून ते जोरजोरात श्वास घेऊन शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात.
हेही वाचा : AC खरेदी करताना 'या' गोष्टी विचारात घ्या, पैसे फुल्ल वसूल होतील!
उन्हाळ्यात कुत्र्यांची काळजी कशी घ्यावी?
जिथं सावली असेल तिथंच कुत्र्याला ठेवा. तिथं गारवाही असायला हवा. त्याच्यासाठी वाटीभर पाणीही तिथं असूद्या. वाटीतलं पाणी वेळच्या वेळी बदला. वाटी स्वच्छ घासून धुवा. कुत्र्याने नेहमीपेक्षा जोरजोरात श्वास घेतला, त्याच्या तोंडातून लाळ बाहेर आली की समजून जा, त्याच्या शरिरात पाण्याची कमतरता आहे.
शक्य असल्यास कुत्र्यासाठी एक लहानसं स्विमिंग पूल तयार करा किंवा त्याला आरामदायी वाटावं यासाठी शेजारी एक पंखा लावा. जर त्याला जास्तच उकडलं तर त्याचं शरीर थंड पाण्याने भिजवा. त्याच्या शरिरावरील केसांची लांबी एक इंचतरी असूद्या, त्यामुळे त्याच्या त्वचेपर्यंत उन्हाच्या झळा पोहोचणार नाहीत. कुत्र्याला दही द्या. दह्यात प्रोटीन आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असतं. शिवाय जेवणात वरण, भात आणि चपातीच द्या.
(बातमीत दिलेली माहिती ही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे आपल्या पाळीव प्राण्यासाठी कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
