मूत्रपिंडं केवळ विषारी पदार्थ फिल्टर करत नाहीत तर रक्तदाब नियंत्रित करण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. काही छोट्या दैनंदिन सवयी नकळतपणे, मूत्रपिंडांना हानी पोहोचवू शकतात. या सवयी वेळीच बदलून किडन्यांचं आरोग्य चांगलं राखता येणं शक्य आहे.
जास्त मीठ खाणं - मीठ शरीरासाठी आवश्यक आहे, पण मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यानं मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडांना रक्त फिल्टर करण्यासाठी जास्त काम करावं लागतं, ज्यामुळे मूत्रपिंडाच्या फिल्टरिंग युनिट्सचं हळूहळू नुकसान होतं. प्रक्रिया केलेले अन्न, जंक फूड आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये मीठ जास्त असतं.
advertisement
Eye Care : वाढत्या प्रदूषणाचा डोळ्यांना धोका, अशी घ्या डोळ्यांची काळजी
सोडा किंवा कार्बोनेटेड पेयं पिणं - सोडा आणि कार्बोनेटेड पेयांमधे साखरेचं प्रमाण जास्त असतंच पण फॉस्फरसचं प्रमाणही जास्त असतं. जास्त साखरेमुळे मधुमेहाचा धोका वाढतो, यामुळे किडन्या निकामी होऊ शकतात. त्याच वेळी, उच्च फॉस्फरस पातळीमुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव येतो आणि मूत्रपिंडांचं कार्य कमी होऊ शकतं.
कमी पाणी पिणं - शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढणं हे मूत्रपिंडांचं काम आहे. हे करण्यासाठी त्यांना भरपूर पाण्याची आवश्यकता असते. तुम्ही कमी पाणी पिता तेव्हा तुमचे शरीर डिहायड्रेट होतं. यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात आणि मूत्रपिंडांवर दबाव येतो. पाण्याअभावी मूत्रपिंडातील दगडांचा म्हणजेच किडनी स्टोनचा धोका देखील वाढतो. म्हणूनच, मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी दररोज आठ-दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे.
Acidity : आम्लपित्त, जळजळ होईल कमी, या उपायांनी करा अॅसिडिटीवर मात
वारंवार वेदनाशामक औषधं घेणं - डॉक्टरांचा सल्ला न घेता किरकोळ आजारांसाठी वेदनाशामक औषधं घेणं मूत्रपिंडांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. ही औषधं दीर्घकाळ किंवा जास्त प्रमाणात घेतल्यानं मूत्रपिंडांतील रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि त्यामुळे थेट मूत्रपिंडांचं नुकसान होऊ शकतं. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय वेदनाशामक औषधं घेऊ नयेत.
झोपेचा अभाव - अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर मोठा परिणाम जाणवतो. त्यातलाच एक भाग म्हणजे मूत्रपिंड. तुम्ही झोपता तेव्हा तुमचं शरीर आणि मूत्रपिंड स्वतःची दुरुस्ती करतात. झोपेच्या कमतरतेमुळे हा ताण वाढतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि साखरेची पातळी वाढू शकते. या दोन्हीमुळे दीर्घकाळात मूत्रपिंडांचं नुकसान होतं. म्हणूनच, मूत्रपिंडांचं आरोग्य राखण्यासाठी दररोज रात्री सात-आठ तासांची पूर्ण झोप घेणं महत्वाचं आहे.
