जाणून घेऊयात चालताना कोणत्या चुका टाळायल्या हव्यात त्या.
चुकीच्या पद्धतीने चालणं :
नवी दिल्लीतल्या वरिष्ठ आहारतज्ञ पूनम दुनेजा यांच्या मते, तुम्ही किती वेळ चालता या पेक्षा कसं चालता याला जास्त महत्त्व आहे. चालताना तुमच्या शरीराची स्थिती बरोबर नसेल, तर शरीरावर अतिरिक्त दबाव येतो. त्यामुळे पोटाची चरबी कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही चालतात तरी फायदा होत नाही. चालताना जर तुम्ही तुमचे डोकं खाली ठेवून किंवा तुमचे खांदे वाकवून चालत असाल तर ही चालण्याची चुकीची आणि अयोग्य पद्धत आहे. कारण यापद्धतीने चालताना पाठीचे आणि पोटाचे स्नायू पूर्णपणे सक्रिय नसतात, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होतच नाही. उलट पोक काढून चुकीच्या पद्धतीने चालताना स्नायू अखडून तुम्हाला पाठदुखी, किंवा हातापायांमध्ये पेटके येऊ शकतात. त्यामुळे चालताना, डोकं सरळ दिशेत ठेवून ताठ मानेने चालणं हे नेहमी फायद्याचं ठरतं. यामुळे पाठ, पोट आणि खांद्यांची व्यवस्थित हालचाल होते. शिवाय शरीरावर अतिरिक्त ताण न आल्याने पोटावरची चरबीही जळायला मदत होते.
advertisement
चालण्याचा वेग :
असं म्हटलं जातं की, आपल्या शरीरासाठी चालणं हा सर्वांगसुंदर असा व्यायाम आहे. ज्याचे अनेक फायदे शरीराला होतात. मात्र जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या उद्देशाने चालण्याचा व्यायाम करता तेव्हा योग्य पद्धतीने चालण्यासोबतच चालण्याचा वेगही महत्त्वाचा असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. जर तुम्ही खूप हळू चालत असाल तर शरीरातल्या जास्त कॅलरीज बर्न होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर फॅटबर्न करण्यासाठी चालायचं असेल तर तुमच्या चालण्याचा वेग हा थोडा जास्त हवा. यामुळे हृदयाचे ठोके वाढतील आणि अधिक कॅलरीज बर्न व्हायला मदत होईल. वेगाने चालल्याने वजन तर कमी होतंच, पण यासोबत हृदयही निरोगी राहायला मदत होते.
योग्य आहार :
वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी फक्त चालणंच पुरेसं नसल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. यामुळे काही अंशी वजन कमी व्हायला मदत होतं. मात्र जर तुम्हाला जास्त प्रमाणात वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला व्यायामासोबतच योग्य त्या पोषण आणि पूरक आहाराकडे लक्ष द्यावं लागेल. कॅलरीयुक्त अन्न खाल्ल्याने चालताना तुम्ही जितक्या कॅलरीज बर्न केल्या आहेत, तितक्याच किंवा त्यापेक्षा जास्त कॅलरीज पुन्हा तुमच्या शरीरात नव्याने येऊ शकतात. म्हणून कॅलरीयुक्त अन्न टाळून प्रोटिन्स, फायबर्स आणि कमी चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पोषक आणि संतुलित आहार फायद्याचा ठरतो.