वाढत्या प्रदूषणाचा सर्वात गंभीर परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होतो. हवेतील PM2.5 आणि PM10 फुफ्फुसांच्या ऊतींना नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे COPD, फुफ्फुसांना संसर्ग आणि दमा यासारख्या फुफ्फुसांच्या गंभीर समस्या उद्भवतात.
प्रदूषणाव्यतिरिक्त, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार यामुळेही फुफ्फुसांवर परिणाम होतो. म्हणूनच, फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी, काही सोपे व्यायाम करू शकता, ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
advertisement
Walking : नवीन वर्षातले संकल्प कायम ठेवा, या व्यायामानं राहिल प्रकृती चांगली
डायफ्रामेटिक ब्रीदिंग - या पद्धतीमुळे फुफ्फुसांमधे खोलवर हवा पोहोचवण्यास मदत होते आणि डायफ्राम मजबूत करायला होते. या व्यायामासाठी, पाठीवर झोपा किंवा सरळ बसा. एक हात तुमच्या छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवा. नाकातून हळूहळू श्वास घ्या जेणेकरून पोट बाहेर येईल आणि छाती स्थिर राहिल. नंतर तोंडानं हळूहळू श्वास सोडा. या व्यायामामुळे फुफ्फुसांचं कार्य वाढते आणि ताण कमी होतो.
अनुलोम-विलोम प्राणायाम - योगामधे, अनुलोम-विलोम हा श्वसनसंस्थेसाठी रामबाण उपाय मानला जातो. त्यामुळे फुफ्फुसांचं कार्य सुधारतं. यासाठी, सुखासनात बसा. उजव्या अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीनं खोलवर श्वास घ्या. आता डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीनं श्वास सोडा. दुसऱ्या बाजूलाही हीच प्रक्रिया पुन्हा करा. यामुळे फुफ्फुसांच्या ऊती लवचिक होतातं आणि दम्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
पर्स-लिप्ड ब्रीदिंग - ओठांनी श्वास घेणं - श्वास घ्यायला त्रास होणाऱ्यांसाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे. यामुळे श्वास सोडण्याचा वेग कमी होतो आणि श्वसनमार्ग जास्त काळ उघडे राहतात. यासाठी, नाकातून सामान्यपणे श्वास घ्या. श्वास सोडताना, मेणबत्ती विझवताना किंवा शिट्टी वाजवताना जशी क्रिया होते तशी करा. श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्यासाठी दुप्पट वेळ घ्या. यामुळे फुफ्फुसातून अडकलेली हवा बाहेर काढण्यास मदत होते.
Urine Infection : हिवाळ्यात तब्येत जपा, UTI रोखण्यासाठी जरुर वाचा ही माहिती
कार्डिओ व्यायाम - फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी फक्त श्वास घेण्याचे व्यायाम पुरेसे नाहीत; हृदय गती व्यायाम म्हणजेच कार्डिओ एक्सरसाईज देखील आवश्यक आहेत. यासाठी, दररोज किमान तीस मिनिटं वेगाने चालणं, धावणं किंवा पोहणं असे व्यायाम करता येतील. कार्डिओ करता तेव्हा स्नायूंना जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असते. हे साध्य करण्यासाठी फुफ्फुसांना अधिक मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे ते कालांतराने चांगले आणि अधिक शक्तिशाली बनतात.
भुजंगासन - छातीच्या आरोग्यासाठी आणि फुफ्फुसांचं कार्य सुधारण्यासाठी हे योगासन खूप फायदेशीर आहे. यासाठी पोटावर झोपा आणि तळवे खाली टेकवा. श्वास घ्या आणि शरीराचा पुढचा भाग वर उचला आणि वर पहा. काही सेकंद थांबा आणि नंतर हळूहळू परत या. यामुळे फुफ्फुसांची श्वसन प्रणाली सुधारते.
हे सर्व व्यायाम करण्याआधी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या किंवा यासंदर्भातले योग प्रशिक्षकांचे व्हिडिओ पाहा. व्यायामासोबतच, धूम्रपान टाळणं, बाहेर जाताना मास्क घालणं आणि हायड्रेटेड राहणं म्हणजेच पुरेसं पाणी पिणं देखील फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. फुफ्फुसांचा गंभीर आजार असेल तर कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
