नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे केवळ दोन वेगळे टॉयलेट क्लीनर एकत्र केल्यामुळे एका महिलेची प्रकृती इतकी बिघडली की तिला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. हे वाचायला साधं वाटत असलं तरी, या प्रक्रियेत तयार होणारा विषारी वायू तुमच्या फुफ्फुसांना कायमचं निकामी करू शकतो.
पल्मोनोलॉजी तज्ज्ञ डॉ. अंकित भाटिया यांनी एका केसचा उल्लेख केला आहे. एक महिला टॉयलेट साफ करत असताना तिने अधिक स्वच्छतेसाठी दोन वेगळे ब्रँडचे क्लीनर एकत्र केले. त्यातून तयार झालेल्या केमिकल रिॲक्शनमुळे तिथे विषारी वायूची निर्मिती झाली. काही सेकंदातच त्या महिलेला श्वास घेण्यास त्रास झाला आणि ती जमिनीवर कोसळली. डॉक्टरांच्या मते, हा 'रिएक्टिव एयरवे डिस्फंक्शन सिंड्रोम' (RADS) होता. हा प्रकार म्हणजे रसायनांच्या वासामुळे आलेला अचानक तीव्र अस्थमा अटॅकच असतो.
advertisement
दोन क्लीनर मिक्स करणं का ठरू शकतं 'सायलेंट किलर'?
जेव्हा आपण ब्लीच किंवा ॲसिड असलेले क्लीनर्स दुसऱ्या केमिकल्समध्ये मिसळतो, तेव्हा 'क्लोरीन' गॅस तयार होतो. हा गॅस शरीरात गेल्यावर हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतं. यामुळे फुफ्फुसांच्या उतींना (Lungs Tissue) कायमस्वरूपी इजा होऊ शकते. अमेरिकन जर्नल ऑफ रेस्पिरेटरी अँड क्रिटिकल केअर मेडिसिननुसार, घरगुती क्लिनिंग स्प्रेचा सतत वापर करणं हे दररोज 20 सिगारेट ओढण्याइतकं घातक असू शकतं.
टॉयलेट क्लीनिंगमधील गॅस आणि केमिकल्सचा सर्वांवर सारखाच परिणाम होत नाही. खालील व्यक्तींनी जास्त सावध राहावे: 1. ज्यांना आधीच दम्याचा त्रास आहे. 2. गर्भवती महिला. 3. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती. 4. ज्यांना वारंवार ॲलर्जी किंवा त्वचेचे आजार होतात असे लोक.
चुकून क्लिनर मिक्स झाले तर काय कराल?
घाबरून तिथेच उभे राहू नका, लगेच त्या ठिकाणाहून बाहेर पडा. टॉयलेटच्या खिडक्या आणि दरवाजे उघडा, पंखा सुरू करा. त्या मिश्रणाला स्पर्श करू नका किंवा ते स्वतः साफ करण्याचा प्रयत्न करू नका. श्वास घेण्यास त्रास झाल्यास किंवा डोळ्यांत जळजळ झाल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.
टॉयलेट साफसफाईचे 11 सुरक्षा नियम:
1. कधीही दोन क्लीनर मिक्स करू नका: विशेषतः ब्लीच आणि ॲसिड किंवा अमोनिया.
2. व्हेंटिलेशन: साफसफाई करताना खिडक्या उघड्या ठेवा आणि एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवा.
3. सुरक्षा साधनं: नेहमी हातमोजे (Gloves) आणि मास्कचा वापर करा.
4. सूचना वाचा: बाटलीवर दिलेल्या सूचना वाचल्याशिवाय क्लीनर वापरू नका.
5. मर्यादित वापर: एकावेळी खूप जास्त केमिकल ओतू नका.
6. थंड पाणी: शक्यतो क्लिनर धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळा, कारण वाफेमुळे केमिकल नाकातोंडात जाऊ शकतं.
7. नियमित स्वच्छता: आठवड्यातून एकदा साफ करण्यापेक्षा रोज हलकी स्वच्छता केल्यास तीव्र केमिकल्सची गरज पडत नाही.
8. मुलांपासून दूर: सर्व क्लीनर्स मुलांच्या हाताला लागणार नाहीत अशा उंचावर ठेवा.
9. नैसर्गिक पर्याय: शक्य असल्यास व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा यांसारख्या नैसर्गिक पर्यायांचा वापर करा.
10. पायाची सुरक्षा: अनवाणी पायाने साफसफाई करू नका, बाथरूम स्लिपर वापरा.
11. त्वचेचा संपर्क: जर केमिकल त्वचेवर पडलं, तर लगेच भरपूर पाण्याने धुवून टाका.
स्वच्छता महत्त्वाची आहेच, पण ती जीवाच्या किमतीवर नको. थोडी सावधगिरी बाळगली तर तुम्ही स्वतःला आणि कुटुंबाला या केमिकलच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवू शकता.
