फॅटी लिव्हरचा त्रास कशामुळे ?
सध्या बदललेली जीवनशैली, जंक फूड, प्रदूषण, मद्यपान, कोंल्ड्रिक्सच्या अतिवापर आणि तणावामुळे यकृतावरचा भार हा अधिक वाढलाय. त्यामुळे अनेकांना फॅटी लिव्हरचा त्रास होऊ लागलाय. तुम्ही सुद्धा जंकफूड खात असाल, मद्यपान करत असाल तर तुम्हालाही फॅटी लिव्हरचा धोका उद्भवू शकतो. जाणून घेऊयात फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय ? आणि त्यापासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
advertisement
कॅलिफोर्नियातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये फॅटी लिव्हर ओळखण्याची 5 लक्षणं सांगितली आहेत. त्यामुळे ही लक्षणं जर तुमच्यातही दिसून येत असतील तर तुम्हाला सावधान होऊन तुमच्या यकृताच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणं काय ?
ढेरी सुटणं :
यकृत तज्ज्ञांच्या मते, फॅटी लिव्हरचं पहिलं साधं सोपं लक्षण म्हणजे पोटाभोवतालचा घेर वाढणं किंवा ढेरी सुटणं. पोट, कंबरेभोवती चरबी वाढत जाते. अनेकदा पोट वाढण्याचं कारण हे शरीरातून कमी प्रमाणात इन्सुलिन निर्मिती, आणि फॅटी लिव्हरशी संबंधित असतं.
सततचा थकवा :
सततचा थकवा हे यकृताच्या आजाराचे प्रारंभिक लक्षण असू शकते. डॉ. सेठी म्हणतात की, फार कष्टाचं किंवा श्रमाचं काम न करताही तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास असू शकतो. त्यामुळे वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उजव्या बरगडीच्या खाली दुखणं :
जर तुमच्या उजव्या बरगडीखाली सतत वेदना होत असतील तर ते फॅटी लिव्हरचं संकेत आहे. या त्रासाकडे ॲसिडिटीचा त्रास म्हणून दुर्लक्ष करू नका.
केस गळणे, त्वचा विकार होणे:
फॅटी लिव्हरमुळे तुमच्या शरीरात इन्सुलिनची निर्मिती कमी होऊ शकते. त्यामुळे जर अचानकपणे तुमचे केस गळायला लागले किंवा अचानकपणे तुमच्या त्वचेचा रंग गडद होऊ लागला किंवा त्वचेवर पुरळ यायला लागले तर ते तुमच्या शरीरात इन्सुलिनच्या स्रावावर परिणाम झाल्याचं आणि फॅटी लिव्हरचा त्रास सुरू झाल्याचं द्योतक असेल.
मळमळ आणि भूक न लागणे :
तुम्हाल भूक लागत नसेल, सतत मळमळ किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर, तुमच्या यकृतावर जास्त भार पडून त्याच कार्य सुरळीत नसणं, जी एक प्रकारे फॅटी लिव्हरची सुरूवात असू शकते.
फॅटी लिव्हरचा त्रास कमी करण्यासाठी काय करावं ?
- जंक फूड, प्रोसेस्ड फूड टाळून, हिरव्या पालेभाज्या, फळं, व्हिटॅमिन आणि फायबर्सयुक्त आहार घ्यावा.
- साखर, गोड पदार्थ, अल्कोहोल, कार्बोहायड्रेट ड्रिंक्स टाळा.
- नियमित व्यायामामुळे यकृतावरची चरबी कमी होण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत होऊ शकते.
- सतत पाणी पित राहा. यामुळे यकृत स्वच्छ म्हणजेच डिटॉक्सिफाय व्हायला मदत होते.
- तुमचं वाढलेलं वजन कमी करा. भले तुमच्या शरीराचं वजन अगदी काही किलोने कमी होईल मात्र त्याचा खूप जास्त परिणाम हा यकृतावर साचलेल्या चरबीवर होऊन तुमचा फॅटी लिव्हरचा त्रास कमी होऊ शकतो.
