उपवासासाठी रताळ्याचे विविध पदार्थ बनवले जातात. अनेकांनी रताळ्याची भातवडी, रताळ्याची खिचडी खाल्ली असेल. परंतु, रताळ्याचे गुलाबजाम देखील अत्यंत चविष्ट लागतात. अगदी झटपट आणि कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते. तसेच अगदी खव्याच्या गुलाबजाम सारखेच चवीला उत्तम गुलाबजाम तयार होतात.
advertisement
रताळ्याच्या गुलाबजामसाठी साहित्य
रताळ्याच्या गुलाबजामसाठी दोन रताळे, मिल्क पावडर, एक वाटी साखर, एक वाटी पाणी, दोन छोट्या इलायची आणि केसर हे साहित्य आवश्यक आहे.
रताळ्याच्या गुलाबजामची कृती
सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुऊन अगदी मऊसूत होईपर्यंत कुकरमध्ये उकडून घ्यायचे. त्यानंतर सालं काढून किसून घ्यायचे आहेत. रताळे किसून घेतल्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर टाकायची आणि घट्टसर गोळा मळायचा. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. हे गोळे तुपामध्ये किंवा शेंगदाण्याच्या तेलामध्ये टाकून चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत.
रताळ्याचे गोळे तळून झाल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. साखरेचा पाक बनवण्यासाठी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी एकत्र करून उकळून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये इलायची पावडर टाकायची आणि केसर उपलब्ध असेल तर केसर टाकायचे. अशाप्रकारे चांगला पाक तयार करून घ्यायचा. पाक थंड झाल्यानंतर आपण जे गुलाबजाम तयार केलेले आहेत ते त्यामध्ये टाकून द्यायचे.
साधारण 15-20 मिनिटं गुलाबजाम पाकात ठेवायचे. त्यामुळे पाक पूर्णपणे त्या गुलाबजाम मध्ये जाईल. अशा पद्धतीने हे रताळ्याचे गुलाबजाम तयार होतात. अगदी साधी सोपी रेसिपी तुम्ही आषाढी एकादशीला घरी देखील ट्राय करू शकता.