मुंबई: महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा पुरणपोळी हा अविभाज्य भाग आहे. कोणताही सण म्हटलं की पुरणपोळी आवर्जून केली जाते. गुढीपाडव्याच्या सणाला तर पुरणपोळीला विशेष महत्त्व असतं. आपण घरात नेहमीच्या पद्धतीनं पुरणपोळी बनवत असाल. पण यंदा जरा हटके रोझ इसेन्स पुरणपोळी ट्राय करू शकता. मुंबईतील गृहिणी स्मिता कापडणे यांनी रोझ इसेन्स पुरणपोळीची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
पुरणपोळीसाठी साहित्य
पुरणपोळी करायची म्हटलं की चना डाळ, साखर किंवा गूळ, मीठ, वेलचीपूड, तूप, मैदा, गव्हाचे पीठ हे साहित्य लागते. रोझ इसेन्स पुरणपोळीसाठीही घरातीलच साहित्य लागते. त्यात फक्त गुलाब इसेन्स आणि गुलाबाच्या पाकळ्या अधिकच्या घ्यावा लागतात.
उभारलेली गुढी विधिवत कधी आणि कशी उतरवावी? उतरलेल्या गुढीच्या साहित्याचे काय करावे, पाहा Video
रोझ इसेन्स पुरणपोळी रेसिपी
रोझ इसेन्स पुरणपोळी बनवण्यासाठी पहिल्यांदा चनाडाळ स्वच्छ धुवून घ्यावी. कुकरला 3 शिट्या करून मऊ शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यातील पाणी चाळणीच्या साहाय्याने गाळून घेणे. मग ते पुरण यंत्र किंवा मैदा चाळायच्या चाळणीने छान गाळून घ्यावे. पातेल्यातील मिश्रणात साखर किंवा गूळ घालावा. हे चांगले एकजीव होईपर्यंत शिजवावे. मग त्यामध्ये चवी नुसार वेलची पूड आणि गुलाब इसेन्स टाकावे. त्यानंतर त्यात ताज्या गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्यात.
सर्व सारण तयार झाल्यावर ते मैद्याच्या पिठाच्या गोळ्यांमध्ये भरुन मस्त अशी पुरणपोळी लाटावी. ती तव्यावर तूप लावून भाजावी. मग आपली अगदी मऊ लुसलुशीत रोझ इसेन्स पुरणपोळी तयार होते. ही रेसिपी अगदी सोपी असून आपण घरात सहज करू शकतो. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला अशाप्रकारची पुरणपोळी ट्राय करू शकता, असे स्मिता कापडणे सांगतात.