डोंबिवली : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थ पिण्याची इच्छा झाल्यानंतर अनेकदा बाहेरून विकत आणलेले कोल्ड्रिंक प्यायला लोक प्राधान्य देतात. मात्र हे थंडगार आणि शरीराला हानिकारक असणाऱ्या कोल्ड्रिंक पिण्याऐवजी तुम्ही लिंबू पुदिन्याचे सरबत पिऊ शकता. पुदिन्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. लिंबू पुदिनाच्या सरबताची रेसिपी आपल्याला गृहिणी अर्चना खवरे यांनी सांगितली आहे.
advertisement
लिंबू पुदिन्याचे सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य
एक लिंबू, अर्धी वाटी साखर, चवीपुरतं मीठ, एक ग्लास पाणी, काही बर्फाचे तुकडे, जिरे आणि पुदिन्याची पाने हे साहित्य लागेल.
भाजून घेतलेले हरभरे अन् लाल तिखट, गावाकडची झणझणीत आमटी, अगदी सोपी रेसिपी
लिंबू पुदिन्याचे सरबत बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम पाणी भांड्यात ओतून त्यात एक वाटी साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यावी. पाण्यात साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ आणि लिंबू पिळून घ्यावं. हे मिश्रण झाल्यानंतर तसेच ठेवावे. आता मिक्सरच्या भांड्यात बर्फाचे काही तुकडे आणि धुवून घेतलेले पुदिन्याची पानं घालावीत आणि बारीक करून घ्यावी.
पुदिना आणि बर्फ वाटून घेतल्यावर त्यामध्ये दोन चमचे जिरे घालावे व पुन्हा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. हे मिश्रण तयार झाल्यावर गाळणीमध्ये गाळून त्यातून पुदिना, जिरे आणि बर्फ याचे पाणी वाटीत घ्यावे. आता हे पुदिनाचे पाणी आपण आधी बनवलेल्या साखरेच्या पाण्यात मिक्स करावे. अशा पद्धतीने आपले थंडगार लिंबू पुदिन्याचे सरबत तयार आहे. हे सरबत देताना वरतून तुम्ही पुदिन्याची पाने टाकून सर्व्ह करू शकता.





