कळण्याच्या वड्या या मुगाच्या डाळीच्या भरडापासून तयार केल्या जातात. या वड्या एकदा बनवल्यानंतर वर्षभर साठवून ठेवता येतात. त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात या वड्या तयार करण्याची परंपरा कायम आहे. विशेष म्हणजे अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी नवीन वड्यांची भाजी बनवण्याची प्रथा विदर्भात आजही जपली जाते.
कळण्याच्या वड्यांसाठी लागणारे साहित्य
advertisement
मुगाच्या डाळीची भरड, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, मेथी, लसूण, जिरे आणि मीठ हे साहित्य लागेल.
बनवण्याची कृती
वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम मुगाच्या डाळीची भरड 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवली जाते. त्यानंतर ती स्वच्छ धुऊन थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवली जाते. भरड थोडी सुकल्यानंतर पाट्यावर वाटण्यासाठी घेतली जाते.
सुरुवातीला हिरवी मिरची, मेथी, लसूण आणि जिरे यांचे वाटण तयार केले जाते. त्यानंतर त्यात भिजवलेली भरड टाकून एकत्र वाटले जाते. तयार झालेल्या या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून ते एका भांड्यात काढून घेतले जाते.
यानंतर तयार मिश्रणाच्या छोट्या-छोट्या वड्या करून त्या सूप, पारडे किंवा स्वच्छ कापडावर टाकल्या जातात. सर्व वड्या टाकून झाल्यानंतर त्या 2 ते 3 दिवस उन्हात चांगल्या प्रकारे वाळवून घेतल्या जातात.
वड्या पूर्णपणे वाळल्यानंतर त्या डब्यात साठवून ठेवता येतात. वर्षभर कधीही या वड्यांची चविष्ट भाजी बनवून जेवणाची मजा वाढवता येते. उन्हाळ्यातील ही पारंपरिक पद्धत केवळ चविष्टच नाही, तर साठवणुकीसाठीही उपयुक्त ठरते. आजही विदर्भात या वड्यांची परंपरा तितक्याच उत्साहात जपली जात आहे.





