अमरावती : उन्हाळा सुरू झाला की जेवणात थंड पदार्थांचा समावेश करावा लागतो. बाहेरील पदार्थ तर आहेच. पण घरीच कमीत कमी वेळात एखादा पदार्थ तयार करायचा आहे? तर कोणता करायचा. एखादी विशेष भाजी, दही, मठ्ठा हे तर नेहमीच बनवले जाते. पण, चटपटीत आणि कमीतकमी वेळात पदार्थ बनवायचा असेल तर, तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतं चना डाळ आणि दह्याची चटणी. ही चटणी कशी बनवायची? याची रेसिपी अमरावतीच्या वृषाली भुजाडे यांनी सांगितली आहे.
advertisement
चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
4 ते 5 तास भिजवून घेतलेली चना डाळ, दही, कोथिंबीर, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, जिरे, हळद, मीठ, तेल, कडीपत्ता, मोहरी हे साहित्य लागेल.
पराठ्यासोबत टोमॅटो सॉस खाऊन कंटाळलात? बनवा चटकदार अशी लसूण चटणी, रेसिपी पाहा
चटणी बनवण्याची कृती
सर्वात आधी भिजवून घेतलेली चना डाळ आणि दही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. ते पूर्णतः एकजीव बारीक करून घ्यायचं. त्यात पाणी टाकायचे नाही. बारीक केल्यानंतर ते ऐका भांड्यात काढून घ्यायचं आणि तडका तयार करून घ्यायचा. तडका तयार करण्यासाठी भांड्यात तेल टाकून ते गरम होऊ द्यायचं. गरम झालं की, त्यात जिरे टाकून घ्यायचे. त्यांनतर हिरवी मिरची टाकून ती परतवून घ्यायची. त्यानंतर हळद आणि मीठ टाकून घ्यायचे. तडका तयार झालेला असेल.
त्यानंतर बारीक करून घेतलेली डाळ घ्यायची आणि त्यात तडका टाकून द्यायचा. व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, कोथिंबीर टाकून घ्यायची. ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चटणी खाण्यासाठी तयार होईल. या चटणीचे विशेष म्हणजे ही चटणी वेळेवर म्हणजे जेवणाच्या काही वेळ आधी तयार करून घ्यायची आहे. जास्त वेळ झाल्यास उन्हामुळे चटणी बेकार होते. कमीत कमी वेळात आणि घरगुती साहित्यापासून टेस्टी अशी चटणी तुम्ही बनवू शकता, असे वृषाली भुजाडे यांनी सांगितले.